Maharashtra news: मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; नोंदणीसाठी चार महिने मुभा
Pckhabar-स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेऊन हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केले आहे.
दि.01 जानेवारी 2021 पासून 31 मार्च 2021 पर्यंत संपूर्ण राज्यासाठी देय मुद्रांक शुल्काचा दर 5 टक्क्यांवरुन 3 टक्के करण्यात आला आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दि.31 मार्च 2021 किंवा त्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरावे व दस्तामधील पक्षकारांनी त्यावर स्वाक्षरी पूर्ण करावी; जेणेकरुन नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील चार महिन्यात पक्षकारांना आपला दस्त नोंदता येईल.
शासनाने दि.01 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत संपूर्ण राज्यासाठी मुद्रांक शुल्कात सूट देऊन देय 5 टक्केऐवजी 2 टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारणी लागू केली. त्याचप्रमाणे दि. 01 जानेवारी 2021 पासून 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्काचा दर 3 टक्के लागू राहणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त्ा नोंदणीकरिता गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता, या सवलतीचा लाभ घेण्याकरिता मार्च 2021 अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन मुंबई शहर सह जिल्हा निबंधक उदयराज चव्हाण यांनी केले आहे.
दस्त नोंदणीचे कामकाज 27 व 29 मार्चला सुरु राहणार
महाराष्ट्र शासनाने माहे डिसेंबर 2020 अखेर व माहे मार्च 2021 अखेर पर्यंत मुद्रांक शुल्कांत घोषित केलेल्या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा, यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग -2 , दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये माहे मार्च महिन्यातील शनिवार दि. 27 मार्च 2021 व दि. 29 मार्च 2021 या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग 2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येत आहेत.
या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डी.पी. पाटील, सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी , पुणे ग्रामीण यांनी केले आहे.
दस्त नोंदणीसाठी मार्च अखेरीस गर्दी न करण्याचे आवाहन
स्थावर मिळकती बाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्त ऐवजावर शासनाने 31 मार्च 2021 पर्यत सूट जाहिर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता पुणे ग्रामीण जिल्ह्यातील 21 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादीत केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणी साठी सादर करता येतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं. पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या, तसेच 29 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्तऐवजांवर अधिभारासह आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणा-या आणि दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपणा-या कालावधीकरीता तीन टक्के तर दि. 1 जानेवारी 2021 पासून सुरू होणा-या 31 मार्च 2021 रोजी संपणा-या कालावधीकरीता दोन टक्केने कमी केले आहेत. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत 31 मार्च 2021 अखेर पर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता पुणे ग्रामीण जिल्ह्यातील एकूण 21 दुय्यम निंबधक कार्यालयात उक्त सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. माहे-मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून निष्पादित करुन मुद्रांक शुल्क भरलेले दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येते.
सबब कोव्हिड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च अखेरीस गर्दी न करता उपरोक्त प्रमाणे नोंदणी कायद्यायातील तरतुदीचा लाभ घ्यावा. तसेच कोव्हीड -19 च्या अनुंषगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे कार्यालयात पालन करावे, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं.पाटील यांनी केले आहे.










Leave a Reply