Talegaon Dabhade news: कंत्राटी कर्मचार्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा : विरोधी पक्षनेते गणेश काकडे
कर्मचार्यांचे थकीत वेतन अदा करण्याची मागणी
Pckhabar-नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचार्याचे गेल्या तीन महिन्यापासून वेतन अदा करण्यात आले नाही. कंत्राटी कर्मचार्यांना नगरपालिका प्रशासन वेठीस धरत असून त्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश काकडे यांनी केला आहे. तसेच कंत्राटी कर्मचार्यांना तीन महिन्याचे थकीत वेतन त्वरीत अदा न केल्यास नगरपरिषदेवर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही काकडे यांनी दिला आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांना आज (गुरूवार) निवेदन दिले.
विरोधी पक्षनेते गणेश काकडे म्हणाले, ’’तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमधील विविध विभागात दैनंदिन कामकाजासह तांत्रिक कामकाजासाठी ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. हे कर्मचारी दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा गाढा ओढत असतात. या सर्व कर्मचार्यांचे जानेवारीपासून वेतन थकीत आहे. कोणत्याही कर्मचार्यांना 30 दिवस काम केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये मोबदला अदा करणे बंधनकारक आहे. असे असताना तीन महिने होत आले तरी या कंत्राटी कर्मचार्यांना अद्याप वेतन अदा केले नाही. त्यानंतरही हे सर्व कर्मचारी नेमूऩ दिलेले कामकाज करत आहेत. नगरपालिका प्रशासन कंत्राटी कर्मचार्यांना वेठीस धरून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे’’.
त्यामुळे या सर्व कंत्राटी कर्मचार्यांचे तीन महिन्याचे थकीत वेतन त्वरीत अदा करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते काकडे यांनी केली आहे. वेतन त्वरीत अदा न केल्यास नगरपरिषदेवर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.










Leave a Reply