Bhosari news: 40 वर्षांपासुन कुटुंबाने पक्षाची सेवा केली हेच चुकलं का ? भाजप नगरसेवक रवि लांडगे यांचा सवाल
Pckhabar- स्थायी समितीच्या सभापतीपदी डावलेले भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी 40 वर्षांपासून पक्षाची सेवा केली हेच चुकलं का? असा सवाल करत भोसरी विधानसभा मतदार संघात सर्वत्र फलकबाजी करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. या फलकांची शहरातील राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा रंगली आहे.
रवी लांडगे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. युवा मोर्चाचे शहराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांचे वडील बाबासाहेब लांडगे, चुलते अंकुशरराव लांडगे यांनी शहरात भाजप रुजविली. प्रतिकुल परिस्थितीत भाजप वाढविली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा धावडेवस्ती, भगतवस्ती मधून रवी लांडगे बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आलेले ते एकमेव नगरसेवक आहेत. त्यांना गेल्या चार वर्षांत एकही पद देण्यात आले नाही. शेवटच्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन भोसरीचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी त्यांना दिले होते. मात्र, ऐनवेळी आमदार लांडगे यांनी आपले नातेवाईक अॅड. नितीन लांडगे यांना स्थायी समिती सभापती पदाची संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या रवि लांडगे यांनी तडकाफडकी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला.
शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी शब्द देवूनही डावलल्याने रवी लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझं चुकलं का? चाळीस वर्षांपासून आमचं कुटुंब भारतीय जनता पक्षाची सेवा करतंय हे आमच्या कुटुंबाचे चुकलं का? सोयीच राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगिकृत केले. हे माझं चुकलं का? माझ्या वडिलांनी शहरात भारतीय जनता पक्षाचा पाया रोवला. माझ्या चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि मीही पक्षनिष्ठ राहिलो हे आमच्या कुटुंबाच चुकलं का? असे प्रश्न विचारणारे फलक रवी लांडगे यांचे भोसरी मतदारसंघात झळकले आहेत. या फलकांची शहरातील राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच दिवसेंदिवस शहर भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली आहे. याचे पडसाद कशाप्रकारे उमटता हे आगामी काळात दिसून येणार आहे.










Leave a Reply