Mumbai news: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घेणार : नाना पटोले

 

Mumbai news: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घेणार : नाना पटोले
Pckhabar-महाराष्ट्र काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत केंद्रातील काळे कृषी कायदे, कामगार कायदे व वाढती इंधनदरवाढ यासह राजकीय विषयांवर चर्चा झाली. संघटना आणि सरकारच्या कामकाजाबाबत या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला.

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून एक दिवस शेतक-यांसोबत हा कार्यक्रम राबवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संकल्प अभियान राबविले जाणार आहे, त्यासाठी सहा महिन्यांचा कार्यक्रम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली आहे.

काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

नाना पटोले म्हणाले की, शेतकरी विरोधी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच तीव्र विरोध केला असून हे कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस पक्षाचा संघर्ष सुरुच राहणार आहे. केंद्रातील हे काळे कायदे महाराष्ट्रात लागू करू नयेत. शेतकरी हिताचा विचार करुन आवश्यक ते कायदे राज्यात आणू, असे नाना पटोले म्हणाले. आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक पातळीवर चर्चा करुन घेतला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *