Pimpri news: महापौरांचे लोका सांगे ब्रह्मज्ञान…महापौर ढोरे यांचा मास्कविना रॅम्पवॉक, सुरक्षित अंतराचा फज्जा  

Pimpri news: महापौरांचे लोका सांगे ब्रह्मज्ञान…महापौर ढोरे यांचा मास्कविना रॅम्पवॉक, सुरक्षित अंतराचा फज्जा

महापौरांवर कारवाई करण्याची मागणी
Pckhabar-कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले असताना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर आणि शहराच्या प्रथम नागरिक उषा ढोरे यांनी ’फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी, नागरिकांनी सुरक्षित अंतर, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. महापौरांसह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासग अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर जशी कारवाई केली जाते, त्याच प्रमाणे महापौरांवरही कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून मास्क वापरा असे आवाहन करणार्‍या महापौरांना मास्क लावण्याचाही विसर पडला. त्यामुळेच ’लोका सांगे ब्रह्मज्ञान’ या उक्तीचा प्रत्यय आला.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्यावतीने सोमवारी चिंचवड येथे ‘फॅशन शो’चे आयोजन केले होते. कोरोनाचे नियम कडक केले असतानाही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नियमांचे कोणतेही पालन केले नाही. अनेकांनी मास्कही परिधान केला नव्हता. महापौर उषा ढोरे यांनीही मास्कविना रॅम्प वॉक केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी आपले पुर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध जाहिर केले. मुख्यमंत्र्यांनीही त्याच दिवशी सायंकाळी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या भाजपच्या महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष करत ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला. हे अतिशय खेदजनक आहे.

या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. हे लक्षात घेता, कोरोनाचे नियम मोडल्यावर प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेवर कारवाई होते, तशीच कारवाई महापौरांवरही व्हायला हवी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
याबाबत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरद्वारे महापौरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही ट्विट टॅग केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *