Sangvi News: गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; 381 सिलेंडर टाक्या जप्त
Pckhabar- सांगवी परिसरात सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजाराचा पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 381 गॅस सिलेंडरच्या टाक्या, गॅस रिफेलींगचे साहित्य, 14 तीनचाकी टेम्पो, 22 मोबाईल फोन असा 24 लाख 49 हजार 670 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सांगवी परिसरातील भैरवनाथ आणि कंकरीया या दोन गॅस एजन्सीमधील कर्मचारी एका गोडाऊनमधून दुसर्या गोडाऊनमध्ये सिलेंडरच्या टाक्या नेऊन तिथे भरलेल्या सिलेंडर टाक्यातून रिकाम्या सिलेंडर टाक्यांमध्ये एक ते दोन किलो गॅस काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी सकाळीच कारवाई केली. यामध्ये तब्बल 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून भरलेल्या आणि रिकाम्या अशा एकूण 381 गॅस सिलेंडर टाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी 14 टेम्पोमधून या टाक्यांची ने-आण करत होते.
प्रत्येक गॅस सिलेंडरच्या टाकीमधून एक ते दोन किलो गॅस काढून घेतला जात होता. त्यानंतर काढून घेतलेला गॅस टाक्यांमध्ये भरून पुन्हा त्याची विक्री केली जात होती. हे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे. त्यामुळे गॅसचा काळाबाजर करणार्यांचे दाबे दणाणले आहेत.
दरम्यान, निगडी, चिखलीसह शहराच्या विविध भागातही घरगुती गॅस चोरीचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.










Leave a Reply