EDITORIAL : पुढाऱ्यांनो चारित्र्य जपा; अन्यथा राजकारणातून उठाल!
Pckhabar- ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अॅण्ड वॉर’ असे म्हटले जाते. मात्र, समाजकारण, राजकारणात उच्च पदावर काम करताना काही गोष्टींचे पुढाऱ्यांनी भान जरूर ठेवले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या महिला प्रकरणाचा धुरळा खाली बसतो की नाही तोपर्यंत सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचे ‘नाजूक’ प्रकरण बाहेर येऊ लागले आहे. सत्तेतील महत्त्वाच्या पक्षाचा विदर्भातील एका मंत्र्यांचे पुण्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी नाव समोर येत आहे. त्यामुळे सरकारच्या मंत्र्यांपासूनच महिला सुरक्षित नसल्याची टीका विरोधी पक्ष करू लागला आहे. या दोन्ही प्रकरणामुळे ठाकरे सरकारची ‘शोभा’ झाली आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून
महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार, नितीन गडकरी आदी चारित्र्यवान नेत्यांचा वारसा लाभला आहे. सध्याच्या काळात सत्ता-पैसा- पैशांतून सत्ता हेच समीकरण झाले आहे. सत्तेसाठी साम, दाम, दंड भेदचा वापर केला जातो. त्यामुळे सद्याच्या राजकारणाचा दर्जा खालावला आहे.
मुंबईतील एका महिलेने राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. या प्रकरणावर मंत्री मुंडे यांनीच सोशल मीडियावर तसे स्पष्टीकरण दिले. “एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी आणि मित्र परिवार यांना माहित होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलं आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे, ही मुलं माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुलं यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे. सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.” असे स्पष्टीकरण दिले. मात्र, यामुळे मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभरात आंदोलन केले. अखेर तक्रार करणाऱ्या महिलेने माघार घेतल्याने हे प्रकरण शांत झाले.
मंत्री धनंजय मुंडे यांचे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत ठाकरे सरकारमधील विदर्भातील एक मंत्री अडचणीत आला आहे. बीड जिल्ह्यातील टिकटाॅक स्टार असलेल्या पूजा चव्हाण हिने चार दिवसांपूर्वी पुण्यातील वानवडी परिसरात राहत्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरूणी आणि संबंधित मंत्र्यांचे ऑडिओ क्लिप माध्यमांच्या हाती लागली आहे. त्यामुळे संशय अधिक बळावला आहे. तसेच मंत्री आपल्या कार्यकर्त्यांला तरुणींचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेण्याची सूचना करत आहे. याबाबत सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे ही आत्महत्या नसून दुसरेच प्रकरण असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजपचे आमदार अतूल भातखळकर यांनी एका मंत्र्याची दबंगगिरी सहन केली आता ठाकरे सरकार ‘राठोडगिरी’ सहन करणार का? असा उपस्थित केला आहे.
राजकारणात मंत्री पदापर्यंत जाण्यासाठी अनेक कष्ट, यातना सहन कराव्या लागतात. हे जरी खरे असले तरी अनेक पुढारी सत्ता, पैसा आला की विविध वादग्रस्त प्रकरणात अडकतात. 21 व्या शतकात सोशल मीडियाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडिया हे दुधारी अस्त्र म्हणून काम करत आहे. कोणत्याही चुकीच्या बाबी लपवून राहू शकत नाहीत. त्या आज ना उद्या उघडकीस येतातच. त्यामुळे पुढाऱ्यांनो चारित्र्य जपा नाहीतर राजकारणातून उठाल असे सांगावे वाटते!
राजकारणातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे
प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिलाही आपला ठसा उमटवित आहेत. राजकारणातही मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे. मात्र, उच्च पदावर जाण्यासाठी पुरूषांपेक्षा महिलांना अधिक संघर्ष करावा लागतो. प्रसंगी महिलांना पुरूषांची ‘मर्जी’ राखावी लागते. त्यामुळे समाजकारण, राजकारणात काम करताना पुरूषांनी महिला बद्दलचा दृष्टीकोन बदलणे काळाची गरज आहे.
संपादक
Pckhabar.Com
Pimpri-Chinchwad.








Leave a Reply