Pimpri news: पार्किंग शुल्क आकारणी रद्द न केल्यास ‘भिक मांगो’ आंदोलन
Pckhabar-पिंपरी चिंचवड शहरात 1 मार्चपासून महापालिका सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर शुल्क आकारणार आहे. तसे धोरण सर्वसाधारण सभेत मंजूर झाले आहे. ही शुल्क आकारणी रद्द न केल्यास ग्राहक हक्क संघर्ष समितीने 15 फेब्रुवारीपासून पालिकेसमोर ‘भिक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
ग्राहक हक्क संघर्ष समिती, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अमोल उबाळे यांनी याबाबतचे निवेदन महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीनंतर शहरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यातच जाचक पार्किंग पॉलिसी लावून पालिका नागरिकांच्या खिशाला कात्री लावू पाहत आहे.
महापालिकेकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत उपलब्ध असताना पार्किंग पॉलिसी नागरिकांच्या माथी का मारली जात आहे, असा सवाल देखील या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. जनतेला न पवडणा-या या पॉलिसीचा पालिकेने सहानभुतीपुर्वक विचार करावा. जाचक पार्किंग पॉलिसी रद्द करावी. असे न केल्यास 15 फेब्रुवारीपासून पालिकेसमोर ‘भिक मांगो’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे.










Leave a Reply