Chinchwad news: …अन् पोलिसांसह नागरिकांनी सोडला सुटकेचा नि: श्वास!
Pckhabar- सकाळी अकराची वेळ… ठिकाण पुणे-मुंबई महामार्ग, चिंचवड… पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ महामार्गावर एक बेवारस बॅग आढळते…बघ्यांची प्रचंड गर्दी होते… बेवारस बॅगची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल होतो…पुण्याकडून मुंबईकडे जाणारा महामार्ग बंद केला जातो…बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले जाते…उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकतो… बॅग उघडताच त्यामध्ये कपडे आढळतात… अन् पोलिसांसह उपस्थितांनी सुटकेचा नि: श्वास सोडला…!
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर चिंचवड येथे पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर महामार्गावर शनिवारी सकाळी एक बेवारस ट्रॅव्हल बॅग आढळली. पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही बॅग उघडल्यानंतर त्यात कपडे आढळून आले. दरम्यान परिसरात बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती.
पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर म्हणाले, ”एक बेवारस बॅग आढळली होती. त्याबाबत बीडीएसला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी बॅग उघडली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. महामार्गावर अनेक ट्रॅव्हल्स बस थांबतात. त्यातील एखाद्या प्रवाशाची ही बॅग असण्याची शक्यता आहे”. पोलीस याबाबत तपास करीत आहेत.










Leave a Reply