Pimpri news: अखेर बोगस एफडीआरप्रकरणी गुन्हे दाखल
Pckhabar- बोगस एफडीआर (बँक गॅरंटी) देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक करणाऱ्या पाच ठेकेदारांवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.
मे. पाटील अँड असोसिएटचे मालक सुजित सूर्यकांत पाटील (वय 26, रा. भोसरी), कृती कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल हनुमंत कु-हाडे (वय 29, रा. पिंपरी), एस बी सवईचे मालक संजय बबन सवई (रा. चिंचवड), वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद जीवन मळगे (वय 47, रा. भोसरी) आणि डी डी कन्स्ट्रक्शनचे दिनेश मोहनलाल नवानी (वय 28, रा. पिंपरी) यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्थापत्य विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश वसते यांनी तक्रार दिली होती.
मे. पाटील अँड असोसिएटने 29 जानेवारी 2019 ते 19 जानेवारी 2020 या कालावधीत पालिकेची पाच स्थापत्य विषयक कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे. मे. कृती कन्स्ट्रक्शनने 24 डिसेंबर 2019 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक चार कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे. एस बी सवईने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक सात कामे घेतली होती. त्यात त्यांनी ठाणे जनता सहकारी बँक, आळंदी शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बनावट असल्याचे आढळून आले आहे.
वैदेही कन्स्ट्रक्शनने 9 ऑक्टोबर 2018 ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 12 कामे घेतली होती. त्यात त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र राजगुरू नगर शाखा, पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बँकांनी दिला नसल्याचे आढळून आले आहे. डी डी कन्स्ट्रक्शनने 27 जून 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पालिकेची स्थापत्य विषयक 24 कामे घेतली होती. त्यात त्यांनी पंजाब नॅशनल बँक नाना पेठ पुणे शाखा यांचा एफडीआर पालिकेला सादर केला. हा एफडीआर बँकेने दिला नसल्याचे आढळून आले आहे.
ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर करून पालिकेची कामे मिळवली असल्याने त्यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करत फौजदारी कारवाई कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पाच ठेकेदारांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागातून स्थापत्य विषयक कामाच्या निविदा काढल्या जातात. त्यात लघुत्तम दराने जो ठेकेदार निविदा सादर करेल त्या ठेकेदाराला ती कामे दिली जातात. दरम्यान, पालिकेची कामे घेताना संबंधित ठेकेदाराला एफडीआर अथवा बँक गॅरंटी द्यावी लागते. पालिकेच्या अनेक कामांमध्ये ठेकेदारांनी बोगस एफडीआर पालिकेला सादर करून कामे मिळवली असल्याची बाब पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी करून पाच ठेकेदारांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.










Leave a Reply