Maval news: एकवीरा देवी गडाचे, ऐतिहासिक लेण्यांचे जतन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
Pc khabar: – महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी-आगरी बांधवांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी गडाचे व परिसरातील ऐतिहासिक लेण्यांचे जतन, संवर्धन करण्यासह विकास आराखडा तयार करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी बैठक संपन्न झाली.
बैठकीची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळावी व त्यातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. गडावर येणाऱ्या भाविकांना पायाभूत व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यामध्ये भक्तनिवास, लिफ्ट, दर्शनरांगेचे नियोजन, सुशोभित गार्डन, हेलिपॅड, इतर दुकाने, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह इ. सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे. आई एकविरा देवी गड व परिसरातील लेण्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या. यावेळी एकविरादेवी मंदिर व लेणी विकासकामांसह पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी मुलभूत सोयीसुविधांचा समावेश या विकास आराखड्यात करावा अशी मावळच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आग्रही मागणी केल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
या बैठकीस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, एमटीडीसी संचालक सावलकर, पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, आर्किटेक्ट शब्बीर उनवाला व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.










Leave a Reply