Pimpri News : वंचितांना पाठबळ हे देशकार्य : डॉ. रामचंद्र गोडबोले

Pimpri News : वंचितांना पाठबळ हे देशकार्य : डॉ. रामचंद्र गोडबोले
Pckhabar- “समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या आदिवासींना पाठबळ देणे हे एक प्रकारचे देशकार्य आहे!” असे विचार सुमारे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ नक्षलग्रस्त दंतेवाडा जवळील बारसूर (छत्तीसगड राज्य) येथील आदिवासींना नि:स्वार्थपणे वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रामचंद्र गोडबोले यांनी व्यक्त केले.

रविवारी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्स (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २) च्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिका महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते भरारी पुरस्कार प्रदान करून डॉ. रामचंद्र गोडबोले यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका उषा मुंढे, लायन्स क्लबचे विभागीय अध्यक्ष मनोज बन्सल, सुनीता गोडबोले, फीनिक्स क्लबचे अध्यक्ष नरेंद्र पेंडसे, उपाध्यक्ष दीपश्री प्रभू, सचिव प्रसाद दिवाण, खजिनदार नंदिता देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्कारानंतर शशांक फाळके आणि आसावरी फाळके यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून डॉ. रामचंद्र गोडबोले यांचे आदिवासींच्या दीर्घ सान्निध्यातील अनुभवविश्व श्रोत्यांसमोर उलगडले. वास्तविक सामाजिक कार्याचा पिंड नसतानाही पत्नी सुनीता गोडबोले यांचे प्रखर सामाजिक भान आणि खंबीर साथ यामुळे बस्तर, दंतेवाडा, बारसूर या नक्षलग्रस्त भागात महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या आरोग्यरक्षक योजनेंतर्गत गोडबोले दांपत्याने कुपोषण, रक्तक्षय (ॲनिमिया), हिवताप, क्षयरोग, कर्करोग अशा विविध आजारांवर औषधे, प्रथमोपचार, शहरातील अद्ययावत रुग्णालयातील उपचार, आरोग्यप्रबोधन अशा निःशुल्क वैद्यकीय सुविधा देऊन हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे.

अंधश्रद्धेमुळे आदिवासी हे आजारी पडल्यावर आधी मांत्रिकाकडे जातात आणि आजार बळावल्यानंतर डॉक्टरकडे येतात. भाषेची अडचण, आर्थिक प्रश्न, लुटले जाण्याची भीती यामुळे आदिवासी शहरात उपचार घेण्यास टाळाटाळ करतात; परंतु सातत्याने केलेल्या प्रबोधनामुळे हळूहळू परिस्थिती बदलते आहे. मुख्य प्रवाहातील समाजाने संवेदनशीलपणे आदिवासी समाजाशी सुसंवाद साधून त्यांना मदत करणे, हे आपले नैतिक कर्तव्य मानले पाहिजे, असे आवाहन डॉ. रामचंद्र गोडबोले यांनी केले. लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *