Pimpri News : प्रभाग रचनेचा आराखडा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता
Pckhabar- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या १३९ जागा आणि ४६ प्रभागांचा कच्चा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभाग रचना तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकाहद्दीत १३९ जागांसाठी ४६ प्रभाग असतील. त्यांत ४५ प्रभाग तीनसदस्यीय, तर एक प्रभाग चार सदस्यांचा आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रासाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश दिला होता. तथापि, ६ डिसेंबर रोजी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे कच्चा प्रभागरचनेचा आराखडा सादर केला. राज्य निवडणूक आयोगाकडून त्याची छाननी करण्यात आली.
रस्ते, चतुःसीमा, नदी-नाले याबाबतच्या नियमांचे पालन झाले का, याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर म्हणजे २० डिसेंबरपर्यंत प्रभागरचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, प्रभागरचना जाहीर झाली नाही. मात्र, निवडणूक आयोगातील सूत्रांच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभागरचना जाहीर होईल. त्यानंतर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती गटांचे आरक्षण टाकले जाईल.
मार्चमध्ये निवडणुका होणार?
जानेवारीत प्रभागरचना जाहीर झाल्यास मार्चमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये मुदत संपुष्टात आलेल्या महापालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात मार्च २०२२पर्यंत मुदत संपुष्टात आलेल्या महापालिकांच्या निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.










Leave a Reply