Article By Dr. Anjali mulke : वय, आकर्षण, दुष्टचक्र आणि जबाबदारी…!

Article By Dr. Anjali mulke : वय, आकर्षण, दुष्टचक्र आणि जबाबदारी…!

Pckhabar- मेडिकल ची डिग्री घेऊन काही काळ सरकारात नोकरी केल्यानंतर नोकरी सोडून जेंव्हा प्रॅक्टिस करायला लागले, तेंव्हापासून समाज जास्त जवळून पाहायला मिळतोय.. एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणून हरएक प्रकारचे पेशंट पाहायला मिळतात हे विशेष.. आणि यामुळे समाजातल्या जराप्रकटापासून ते सरणगंतव्यापर्यंत सर्व वयोगटाचे आणि सर्व प्रकारचे मानव एक जनरल प्रॅक्टिशनर म्हणून अनुभवायला मिळतात.. त्यांच्या दुखण्यासोबत कित्येकदा त्यांच्या वैयक्तिक समस्याही नजरेत येतात, समजतात..!पण अलीकडे प्रॅक्टिसमध्ये, या वयोगटांपैकी एका विशिष्ट वयोगटाच्या विशिष्ट बाबीने माझं लक्ष आकर्षून घेतलं आहे..

मुंबईत प्रॅक्टिस करत असतांना, मला सतत जाणवतंय, की, बराच मध्यम वयीन वर्ग म्हणजे शालेय ते लग्नाच्या आधीच्या स्टेज पर्यंत च्या मुली (सोबत मुलं) माझ्याकडे येत असतात..

या मुली सहसा एकट्या येतात.. किंवा त्यांच्यासोबत एक मुलगा असतो..
घरातील मोठी “करती सवरती” माणसं नसतातच..!(नसतात’च’ लिहिलंय, कारण ती नसतातच..!)

या मुलींची एकच कॉमन कम्प्लेन असते..
ती म्हणजे पाळी चुकल्याची..!

कित्येक मुली माझ्या क्लिनिक मध्ये आल्या असतील, ज्यांना हाच प्रॉब्लेम होता, असतो..

प्रश्न विचारतांना, लग्न झालंय का म्हणल्यावर सहसा(99.9%) ‘नाही’ हेच उत्तर असतं..

दुसरा प्रश्न- (ही खरी गोम असते) बॉयफ्रेंड आहे का..?

तिचं उत्तर- हो च असतं.. (इथं मुंबईत तुम्हाला नाही हे उत्तर ऐकू येणार नाहीच सहसा..!
बाकी लहान शहरांत ते असतात पण लपवल्या जातात, इतकंच..!)

तिसरा प्रश्न- त्यांच्यात काही फिजिकल रिलेशन म्हणजे शरीरसंबंध राहिले आहेत का, हाच असतो..
आणि तोच विचारावा लागतो..

तिचं उत्तर- सहसा ‘हो’ असतं..
किंवा मग ‘नाही तसं तर काही नाही, पण आम्ही प्रिकौशन घेतली होती’ हे असतं..

त्यानंतर सगळ्यात पहिले मी त्यांना UPT म्हणजे युरिन द्वारे केली जाणारी प्रेग्नन्सी टेस्ट करून येण्याचा सल्ला देते, त्यानंतर, ती किंवा ते दोघे, हो म्हणून जातात..
आणि नंतर दुसऱ्या दिवशी फॉलोअप ला बोलवल्या नंतरही येत नाहीत..

मग पंधरा एक दिवसात दुसरे दवाखाने धुंडाळून परत माझ्याकडे येतात आणि सांगतात, की, ती टेस्ट पॉझिटिव्ह नाहीच मॅडम, तुम्ही पाळी येण्याच्या गोळ्या द्या..
ती किट दाखवायला सांगितली तर मात्र त्यावर ते कारणं देतात, टाळतात..
सोनोग्राफी करून घ्यायला सांगितल्यावर परत ‘ok’ म्हणून परत इतर कोणा प्रॅक्टिशनर चे दरवाजे झिजवत फिरतात..सहसा लेडीज प्रॅक्टिशनरचा रस्ता धुंडाळतात..

असं करत करत, पुढे त्यांचं काय होतं, ते आपण सगळे कल्पना न केलेलंच बरं..!
कारण क्षणिक सुखापायी पुढे एका मोठ्या दुष्टचक्रात ते अडकत जातात.. त्याची पुढे आपण चर्चा करूच..

शाळा करण्याच्या वयापासून विरुद्ध लिंग आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे..
पण, ज्या पद्धतीने या 7 वी 8 वी च्या मुलां-मुलींपासून ते कॉलेजपर्यंत ची मुलं मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराची मुभा स्वतःला स्वतः च बहाल करून घेतात, त्यावरून या राष्ट्राची कोणत्या दिशेने वाटचाल चालली आहे ते पाहून मनात काटा उभा राहतो..!

आत्ताच बातमी वाचली मी, की, सरकार म्हणतंय, की, आता मुलींच्या लग्नाचे वय, 18 वरून 21 करण्याचा प्रस्ताव आहे..
का?? तर मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने हे योग्य आहे असे त्यांच्या टास्क फोर्स ला वाटते..

पण यामागच्या छुप्या अंधाऱ्या धारदार बाजूंचा त्यांनी विचार केलाय का, हा प्रश्न उरतो..!

आपला देश भारत आणि इंडिया अशा दोन प्रकारचा आढळतो असं आपण म्हणतो..!
पण समाजात राहून काम करत असताना समाज जवळून बघण्यात येतोय, तेंव्हा आता अजून एक बाब समोर येतेय की, भारत आणि इंडिया यांच्या मधल्या स्तरावरचा, इधर ना उधर बीच में अदर असणारा एक देश अस्तित्वात आहे, ज्याचं बारसं अजून व्हायचं आहे.. कारण याचं अस्तित्व कोणाला सहसा लक्षात येत नाही..!

या मधल्या देशात अशी लोक खचाखच भरलेली आहेत, की जी गरीबीचे चटके सोसत असणाऱ्या भारताचाही भाग नाहीत, ना श्रीमंत वा उच्च मध्यमवर्गीय लोकांच्या इंडियातील भागही नाहीत..
ही निम्न मध्यमवर्गीय लोक आहेत, ज्यांना गरीब म्हणता येणार नाही, कारण रोजची रोजीरोटी खाऊन थोडीशी चैन करण्याइतपत खूप थोडा पैसा यांच्याकडे उरतो.. त्या थोड्याशा पैशाला ते बक्कळ समजतात..
ज्या पैश्यांत हे लोक शिक्षण, आरोग्य इ बाबी सहित उच्च वर्गातील श्रीमंत लोकांच्या बाबी, लाईफस्टाईल बघून त्याप्रमाणे कॉपी करायचा प्रयत्न करतात.. कारण, उच्च वर्गातील अय्याश चैनीच्या आयुष्याचं या लोकांना भयंकर आकर्षण असते..!

अशी मंडळी, शिक्षणाला महत्व देताना कमीच पहायला मिळतात..
काही अपवाद असतात, ज्यांना शिक्षणाचे महत्व पटलेले असते, ते फक्त या चैनीच्या मोहजालापासून दूर राहून शिक्षणात बाजी मारतात, पण यांची संख्या कमीच..!

या मंडळींना , मॉल, आऊटींग, भटकंती, बाहेर फिरणे, खाणे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड सोबत मोकाटगिरी करणे (कुठेतरी स्वस्त ठिकाणी जाऊन शारीरिक गरज भागवणे) या गोष्टींचे भयंकर आकर्षण असते..!

आजकाल तर कॉलेज सोडा पण शाळांमध्ये देखील बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असणं हा प्रेस्टीज चा भाग बनला आहे..
व्हर्जिन असणे म्हणजे खिल्ली उडवण्याचा भाग होणे हा विचित्र प्रकार या मुलांमध्ये झाला आहे..
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असले म्हणजे मग शारीरिक संबंध असतातच, ही जणू संस्कृती बनत चालली आहे..!

हा भाग मग केवळ या वर्गापूरता नसून, या वर्गापासून ते श्रीमंत उच्चवर्गीय लोकांपर्यंत आहे..
यातून कदाचित खेडोपाडी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुटल्या असाव्यात, निदान आत्ता तरी असे वाटते..
बाकी कॉलेजेस मध्ये तर हे पेव मधमाशांसारखं पसरलं आहे.. ज्यात या “गोड मधाच्या” क्षणिक लालसेने आकर्षित झालेले मुलं मुली, त्या मधमाशांचा डंख पण आयुष्यात मारून घेतात..
आणि मग ती क्षणिक लालसा गरजेचा कधी भाग बनली हे त्यांचं त्यांनाही कळत नाही..!

हे सगळं घडतांना, पालक, शिक्षक, राजकीय अस्मिता सर्वच आंधळी बनली आहे असं दिसतंय, कारण हा मुद्दा कोणी इतकं गांभीर्याने घेताना दिसत नाहीये..

पण हा विखार जर वेळीच रोखला नाही, तर पिढ्या न् पिढ्यांचे आयुष्य बरबाद होण्यास आपणच जबाबदार असू..

शाळा कॉलेजांमध्ये मोठ्या संख्येने एकत्र आल्यानंतर शरीर धर्म हा एकच विषय आवडीने चघळला जातोय..
पण नितिमत्ता, नैतिक मूल्ये, नैतिक जबाबदारी, नैतिक शिक्षण याची ओळखही याच वयात होणे गरजेचे असते..

एकतर आपल्या भारतात, आत्ताच्या बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार असलेल्या वयोमर्यादेनुसार, 27% मुलींचे लग्न 18 वर्षाच्या खालीच केले जाते..
त्यात कित्येक छुप्या काळ्या बाजू लपलेल्या आहेत..

आता हे वय 21 करणार.. म्हणजे कायद्यानुसार बालविवाह हा 21 वर्षांच्या खाली ठरवला जाणार..

म्हणजे आपोआप बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण वाढणार..
कारण भारतात 18 वर्षे वयच जनतेच्या अजूनही पचनी पडलेलं नाही, तर 21 वर्षे वयापर्यंत मुलींना लग्नाशिवाय केवळ शिक्षणासाठी ठेवणे म्हणजे ‘जोखीमच’ हा सूर असणार..!

दुसरी गोष्ट म्हणजे, सरकार ज्या निम्नवर्गीय मुलींसाठी एकंदर हा निर्णय घेत आहे,त्यांना आणि इतरही सर्व वर्गातील मुलामुलींना लैंगिक शिक्षणासोबत, नैतिकतेचे आणि सामाजिक शिक्षण देणेही तितकेच गरजेचे आहे..

वय वाढवून मुली शिकतील, त्यांची प्रगती होईल असे या सरकारी टास्क फोर्स ला वाटते आहे..

पण हे जे संस्कृतीचे वाभाडे शालेय जीवनापासूनच काढले जात आहेत आणि त्यातून शारीरिक आणि मानसिक आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढत आहेत, ह्यावर प्रकाश टाकला जायला हवा..

कारण शरीर संबंध ठेवून या अशा नकोशा प्रेग्नन्सी, मग छुपे अबोर्शन्स आणि छुप्या डिलिव्हरी , नवजातांची कत्तल आणि अनाथ आश्रमांमधली वाढती संख्या, प्रोस्टीट्युशन इ अनेक काळ्या पैलूंचा विचारच होत नाही..!

ही संस्कृती पाश्चात्य संस्कृतीची देण आहे, जी आपला देश पोखरून काढत आहे..
बॉलिवूड सारख्या गचाळ प्रणाली आपल्या देशात लिव्ह इन आणि शरीर संबंध असे आकर्षण निर्माण करण्यात अग्रेसर आहेत..
त्यांच्याकडून सरकारला केवळ पैसा मिळतो म्हणून या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करून देशातील नवीन पिढीला अनैतिकतेच्या आणि पर्यायाने नैराश्य आणि इतर गंभीर समस्यांच्या गर्तेत ढकलणे कितपत योग्य आहे..!!?

लिव्ह इन हा वेगळा विषय असला तरीही, अशा विषयांना पूर्णपणे समजून न घेता आपले मुलं मुली त्यात केवळ आकर्षणापोटी उडी घेत आहेत..
त्यातील सामंजस्य त्यांच्याकडे क्वचितच हजारात एखाद्याकडे पाहायला मिळतं..
पण शरीर धर्म हा एकच आकर्षणाचा मुद्दा उचल खात आहे..
त्यातून कित्येक नैराश्यासारखे मानसिक व्याधी जन्म घेत आहेत..

त्यातून मग व्यसनाला जवळ केले जाते आणि मग ड्रग्स, कोकेन, सिगरेट, दारू इ कित्येक व्यसने आकर्षण किंवा नैराश्याचा परिपाक म्हणून पदरात पाडून घेतांना ही तरुणाई दिसत आहे..!
यातून मग ड्रग माफिया, प्रोस्टीट्युशन आणि तत्सम गुन्हेगारी वाढीस लागते..
आणि या दुष्टचक्रात तरुण पिढी अडकत चालली आहे..
विशेषतः मुलींना कित्येक ठिकाणी गैर व्यवसायात अडकवले जाते इथपर्यंत ही मजल गेलेली आहे..
आजकाल तर मोबाईल आणि इंटरनेट च्या युगात ह्या बाबी सहज झाल्या आहेत..
त्यात व्हीडीओ द्वारे मुलींचे ब्लॅकमेलिंग, त्याची क्लिप प्रसारित करून पैसा कमावणे, प्रोस्टीट्युशन इ कित्येक भयंकर बाजू आहेत..!

देशाचं भविष्य असणाऱ्या या पिढ्या खोट्या आणि क्षणिक आकर्षणाला बळी पडून त्यांना कसलेही भविष्य उरत नाही आहे..!

कित्येक पैलू आहेत, जे दुर्लक्षित राहिले जात आहेत किंवा राजकीय अनास्थेमुळे त्यांकडे सोयीस्कर पणे डोळेझाक केली जात आहे.. कारण यात केवळ पैसा कमावणारे जर राजकीय प्रतिनिधी असतील तर देशाच्या पिढ्यांच्या बरबादी चे त्यांना सोयरसुतक असावे ही अपेक्षा कशी करावी..!?

त्यामुळे, पालक शिक्षक आणि सामान्य नागरिकांना आपल्या घरापासून या समस्येवर अत्यंत समंजसपणे तोडगा काढणे क्रमप्राप्त आहे..!

केवळ सरकारने लग्नाचे वय वाढवून काहीतरी उपकार केल्याच्या दिखावा करण्यापूर्वी या आणि यासम सर्व अंधाऱ्या बाजूंचा सखोलपणे विचार करून त्यावर उपाय करणे अत्यंत निकडीचे झाले आहे..!!

पालकहो, आपल्या पाल्यांची वेळीच काळजी घ्या, त्यांना सर्व प्रकारचे त्यात लैंगिक शिक्षणासाहित नैतिक शिक्षणापर्यंत शिक्षण देण्यासाठी अग्रेसर रहा, जेणेकरून चोरून या बाबी करतांना या मायाजालात आपली भावी पिढी बरबाद होणार नाही, याची काळजी घ्या..

शारीरिक आकर्षण ही खूप सामान्य आणि सहज बाब आहे, मुलांनाही समजून घेणं गरजेचं आहे..
केवळ आततायीपणा करून उपयोग नसतो..!
ऑनर किलिंग च्या घटना अतिशय दुर्दैवी असतात..
या वयात मुलांना समजून घेणे आणि समजावून सांगणे, हाच उत्तम पर्याय असतो..
त्यासोबतच भावना आणि नीतिमत्ता त्यांच्या आयुष्यात असतील याची तजवीज आपणच केली पाहिजे, जेणेकरून त्यांचं भविष्य केवळ क्षणिक आकर्षणापायी पणाला लागणार नाही..!

लेखिका- डॉ. अंजली मुळके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *