Pimpri News : कन्व्हेयन्स डीड करणे अत्यंत गरजेचे : मुख्य अभियंता मकरंद निकम

Pckhabar- सोसायट्यांचे कन्व्हेयन्स डीड कशा पद्धतीने करून घ्यायचे. तसेच त्याला लागणारे जे पेपर असतात ते योग्य ठिकाणी आपण जोडून दिले तर खूप कमी वेळात ही प्रक्रिया पूर्ण होऊन सोसायट्यांची कामे होतात. कन्व्हेयन्स डीड करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सोसायट्याचे सभासद हे त्या जागेचे पूर्णपणे मालक होतात आणि बिल्डर त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही, अशी महत्वपूर्ण माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मकरंद निकम यांनी दिली.

पूर्णानगर परिसरातील गृहनिर्माण सोसायटयांच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. गृहनिर्माण संस्था ट्रान्स्फर डीड, सेल डीड, कन्व्हेयन्स डीड, वाढीव एफएसआय, सोसायटी रजिस्ट्रेशन, सोसायटी ऑडीट या चार विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मकरंद निकम, भूमि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, माहिती सल्लागार सारंग कामतेकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी निकम बोलत होते.
भूमि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी मार्गदर्शन करताना सोसायट्यांना येणार्या ज्या अनेक समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एक खिडकी योजना तयार केली असून तिच्या माध्यमातून आपण सोसायट्यांची वेगवेगळी कामे मार्गी लावू शकतो, असे सांगितले. तसेच सोसायट्यांमध्ये असणारे सेल डीड, लीज डीड यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.
माहिती सल्लागार सारंग कामतेकर यांनी सोसायट्यांमध्ये असणार्या कुरघोड्या थांबवल्या तर अनेक कामे आपोआप मार्गी लागतात. वाढीव एफएसआय सोसायट्यांनी त्याचा कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा, त्याचबरोबर सोसायटीमध्ये सेल डीड, वाढीव एफएसआय तसेच ट्रान्सफर आणि सध्या प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यामध्ये समन्वय साधून नागरिकांची कामे कशी सोप्या पद्धतीने करता येतील यासाठी वारंवार अशा प्रकारचे मेळावे घेऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्याचा मानस कामतेकर यांनी व्यक्त केला.










Leave a Reply