Maharashtra News : जीवनाचे ध्येय निश्चित करा :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे

Maharashtra News : जीवनाचे ध्येय निश्चित करा :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे

गिरीश प्रभुणे यांचा अण्णा हजारे यांच्या हस्ते सत्कार

Pckhabar- “जीवनाचे ध्येय निश्चित करा. मरण आले तरी ध्येयापासून विचलित होऊ नका. देहभान विसरून कार्य करीत राहिल्यास पुरस्कार आपोआप मागे येतात!” असे विचार पद्मभूषण अण्णा हजारे यांनी पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करताना यादवबाबा मंदिर, राळेगणसिद्धी येथे शनिवारी  व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेश औटी, क्रांतिवीर चापेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक नटराज जगताप, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ कोरडे, गतिराम भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ समाजसुधारक गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताब प्राप्त झाल्याप्रीत्यर्थ अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अण्णा हजारे पुढे म्हणाले की, “गिरीश प्रभुणे यांच्या सामाजिक कार्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्या कार्याचा प्रवास खूप खडतर असला तरी तो समाजासाठी प्रेरणादायी आहे. पद्मश्रीपेक्षाही अधिक उत्तुंग  सन्मान त्यांच्या वाट्याला यावेत, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो!” सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे म्हणाले की, “निमगाव म्हाळुंगी येथे १९८३ साली माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळातच अण्णांसारख्या ऋषितुल्य अन् कृतिशील व्यक्तिमत्त्वाचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मला लाभल्या. त्या बळावर त्या परिसरातील पाणीटंचाई तसेच अनेक सामाजिक समस्या मार्गी लावता आल्यात, या गोष्टीचे मोठे समाधान आहे!”

सत्काराच्या प्रारंभी कवी भरत दौंडकर यांनी आपल्या ‘गोफ’ या प्रसिद्ध कवितेचे सादरीकरण केले; तसेच डॉ. विठ्ठल वाघ यांच्या,

“दिले सामर्थ्य प्रभूने

औदार्य तुझे पाहुनी

लोकसेवा साधियली

गिरीकंदरा उल्लंघुनी

फिनिक्स तुझे झेपावती

राखेतल्या जिण्यातुनी

पद्मश्रीचा सन्मान हा

पद्मभूषणा हातुनी!”

या काव्यमय शुभेच्छांचे अभिवाचन करण्यात आले. सुरेश कंक, आसाराम कसबे, प्रदीप गांधलीकर आणि राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *