Sports News : विराट कोहलीला वनडे कर्णधारपद सोडण्यासाठी दिली होती 48 तासांची मुदत, सल्ला धुडकावताच बीसीसीआयने केली उचलबांगडी

Pckhabar- काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी-20 संघाचे कर्णधार पद सोडणाऱ्या विराट कोहलीला बीसीसीआयने मोठा धक्का दिला आहे. विराटची वनडे कर्णधारपदावरून उचलबांगडी केली असून त्याच्या जागी ओपनर बॅट्समन रोहित शर्माची नियुक्ती केली आहे.
बीसीसीआयने विराट कोहलीला स्वेच्छेने कर्णधारपदावरून बाजूला होण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. मात्र बीसीसीआयचा हा आदेश विराटने धुडकावून लावला होता. त्यानंतर बीसीसीआयने विराटची कर्णधारपदावरून हकालपट्टी करत त्याजागी रोहित शर्माची नियुक्ती केली.
2023 च्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळण्याची विराट कोहलीची महत्त्वाकांक्षा होती. मात्र बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीने त्याला कर्णधारपदावरून हटवले. ज्यावेळी भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतून जेव्हा बाहेर पडला तेव्हाचा विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवणे निश्चित झाले होते. बीसीसीआय त्याला कर्णधारपदावरून बाजूला होण्यासाठी सन्मानजनक मार्ग देऊ इच्छित होती. मात्र अखेरीस विराटने मला कर्णधारपदावरून हटवून दाखवाच, अशी भूमिका घेतली. त्यानंतर बीसीसीआयनेही त्याला आपली ताकद दाखवत कर्णधारपदावरून नारळ दिला. त्यामुळे विराट कोहलीचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.











Leave a Reply