Dehugaon Nagar Panchayat Election News : अर्ज छाननीत 20 अर्ज अवैध, 62 अर्ज वैध
राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण; बंडखोरांना थंड करण्याचे स्थानिक नेत्यांसमोर आव्हान

Pckhabar- नव्याने निर्माण झालेल्या देहू नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जागांसाठी तब्बल 82 इच्छुकांनी उमेदवार अर्ज भरले होते. मात्र, काल बुधवारी झालेल्या अर्ज छाननीत काँग्रेसच्या एका उमेदवारासह 20 जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. 13 जागांसाठी आता 62 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, अर्ज माघार घेण्याची मुदत 13 डिसेंबर असून या कालावधीत काही अपक्ष उमेदवार अर्ज माघार घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यानंतरच निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्याने देहू नगरपंचायतीच्या चार प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. ओबीसींच्या प्रभाग 11, 12, 14, 15 मधील निवडणूक स्थगित झाली असून हे चार प्रभाग वगळून निवडणूक होणार आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. देहू नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 13, भाजपा 13, शिवसेना 8 आणि काँग्रेसचे 6 उमेदवार असून, 22 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, अर्ज माघार घेण्याची मुदत 13 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून या कालावधीत काही अपक्ष उमेदवार अर्ज माघार घेतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यानंतरच निवडणूक रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, देहू नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छूक होते. इच्छुकांनी’अभी नहीं तो कभी नहीं’ याप्रमाणे अपक्ष उमेदवार अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली असून पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे स्थानिक नेते बंडखोर उमेदवारांची कशी समजून घालून अर्ज माघार घेण्यास लावतात, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.











Leave a Reply