Dehugaon News : नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास आजचा शेवटचा दिवस
प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता

Pckhabar- देहू नगरपंचायतीच्या प्रथम निवडणूकीसाठी आज (मंगळवार) अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यानंतरही प्रमुख राजकीय पक्षांच्या आघाडी, युती झाली नसल्याने सर्वच राजकीय पक्ष स्वबळावरच नगरपंचायत निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. तर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची वेळ आहे.
21 डिसेंबर रोजी होत असलेल्या देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, सहाव्या दिवसापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा केला नाही. 56 उमेदवारांनी 90 ऑनलाईन अर्ज भरले आहेत. काही उमेदवारांनी दोन पेक्षा जास्त अर्ज भरले आहेत.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याचे देहू नगरपंचायतीच्या निवडणूकीतून दिसून येत आहे. 17 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल 61 जण इच्छूक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी वाढली आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी आज शेवटच्या काही मिनिटांत अधिकृत उमेदवारांना पक्षाचा एबी फार्म दिला जाणार असल्याचे समजते. तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस यांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत. त्यामुळे आज सायंकाळी अर्ज दाखल केल्यानंतरच प्रमुख पक्षाचे उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. मात्र, इच्छूक उमेदवारांमध्ये आपल्याला पक्षाचा अधिकृत एबी फार्म मिळेल की नाही याबाबत धाकधूक निर्माण झाली आहे.
दरम्यान, अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस असल्याने वैंकुठगमण भक्तनिवासातील तात्पुरत्या स्वरूपात बनविण्यात आलेल्या निवडणूक कार्यालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.











Leave a Reply