Chinchwad Crime News : आमदार बंधूंच्या कार्यालयावरील पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Chinchwad Crime News : आमदार बंधूंच्या कार्यालयावरील पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश
तिघांना अटक, दोन अल्पवयीन ताब्यात


Pckhabar- ’ झटपट पैसे कमविणे’ आणि उद्योजक शंकर जगताप यांनी आरोपींच्या वाढदिवसाचा केक न कापल्याचा राग मनात धरून आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयावर  पेट्रोल बॉम्ब हल्ला केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

तन्मय रामचंद्र मदने (वय 19, पिंपळे गुरव), विक्रम विजय जवळकर (वय 20, रा. रेल्वे समोर, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (वय 23, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शंकर जगताप यांच्या कार्यालयावर 23 नोव्हेबर रोजी दुपारी पेट्रोल बॉम्ब हल्ला झाला होता. पोलिसांनी गाडीच्या रंगावरून आरोपींचा शोध घेतला. विक्रम जवळकर याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी गुन्हेगारांना पुरविली होती. त्याच्या घरी गोठ्यात या गुन्ह्याचा कट रचण्यात आला होता. प्रद्युम्न भोसले याचा 7 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त ’मास्टरमाईंड’ असे लिहिलेला केक घेऊन आरोपी तन्मय व आरोपी प्रद्युम्न हे त्यांच्या मित्रांसोबत चंद्ररंग डेव्हलपर्स या कार्यालयात शंकर जगताप यांच्या हस्ते केक कापण्यासाठी आले होते. जगताप हे त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे केक न कापता त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत गाडीत बसून निघून गेले. याचा राग प्रद्युम्न भोसले यांच्या मनात होता.

दरम्यान, दिड वर्षांपूर्वी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कै. नगरसेवक दत्ताकाका साने यांचे ऑफीस काही गुंडानी फोडले होते व दहशत निर्माण केली होती. या गुन्हयात प्रद्युम्न याचा वर्गमित्र सॅमसग अ‍ॅमेट, देवेंन्द्र बिडलान हे सहभागी होते. त्या गुन्हयामध्ये दत्ताकाका साने यांच्या राजकीय विरोधक नेत्याचे नाव न घेण्यासाठी त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. त्याचप्रमाणे या गुन्ह्यातसुध्दा जर तन्मय मदने व त्याचे साथीदार पकडले गेल्यास तोच फॉर्मुला वापरून शंकर जगताप यांच्या विरोधकांकडे नाव न घेण्यासाठी मोठ्या रक्कमेची मागणी करायची असे नियोजन प्रदयुम्न भोसले व तन्मय मदने याने केले होते. तन्मय याने विक्रम विजय जवळकर व दोन विधी संघर्षित बालक यांना कटात सामावून घेतले. आरोपी तन्मय मदने हा श्रीमंत कुंटुंबातील असून त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर आहेत.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, दिलीप जाधव, पोलीस उप निरीक्षक येडे, गोसावी, वरूडे, गायकवाड व सांगवी पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोहवा नितीन काळे, पोहवा गणेश धामणगावकर, पोना विजय मोरे, प्रविण पाटील, विवेक गायकवाडड, प्रमोद गोडे, सागर सुर्यवंशी, हेमंत हांगे, अनिल देवकर, विनायक डोळस, विश्वनाथ असवले, नुतन कोंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *