Pimpri News : फुले सृष्टी, शाहू सृष्टी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील : छत्रपती संभाजीराजे

Pimpri News : फुले सृष्टी, शाहू सृष्टी
येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील : छत्रपती संभाजीराजे

Pckhabar-क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी उभ्या केलेल्या पुरोगामी चळवळीला फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या माध्यमातून मांडण्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम स्तुत्य असून येणा-या पिढ्यांना सतत मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा ठरेल असे प्रतिपादन
छत्रपती, खासदार संभाजीराजे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.१० मध्ये के.एस.बी. चौक, शाहूनगर येथे राजर्षी शाहू पुतळ्याजवळ शाहू सृष्टीमधील विकसित करण्यात येणा-या कामाचा शुभारंभ तसेच पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले पुतळा परिसरात फुले सृष्टी तयार करण्याच्या कामाचा भुमिपूजन समारंभ खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आमदार महेश लांडगे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अँड नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, नगरसदस्य केशव घोळवे, संतोष लोंढे, तुषार हिंगे, नगरसदस्या शर्मिला बाबर, माजी नगरसदस्य मारुती भापकर, स्विकृत सदस्य सुनिल कदम आदींसह सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महापुरुषांचे पुतळे असले पाहिजेत मात्र त्यांचे जीवन स्मारक निर्माण करायचे असल्यास महापुरुषांचे विचार त्याठिकाणी असणे आवश्यक असते. महापुरुषांनी आयुष्यभर समाजकार्य करुन समाजाला दिशा दिली. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांनी पुरोगामित्वाचा पाया रचला असून शिवराय–फुले–शाहू-आंबेडकर या महान व्यक्तींचे विचार नव्या पिढी पर्यंत पोहचले पाहिजेत ही काळाची गरज आहे. या महापुरुषांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा होता हे नवोदित पिढीला समजले पाहिजे. त्या अनुषंगाने फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका करीत असलेले काम कौतुकास्पद आहे, असे सांगून ही सृष्टी उभारताना आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले. महापुरुषांच्या उदात्त आणि दुरदृष्टीकोनाबद्दल बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग यावेळी सांगितले.

महापौर ढोरे म्हणाल्या, महापुरुषांनी इतिहास घडविल्यामुळे आपण त्यांचे पुतळे उभे करतो. त्यांनी केलेल्या कार्याची नवोदीत पिढीला माहिती व्हावी यासाठी ते प्रेरणादायी ठरतात. या सृष्टीमध्ये  म्युरल्सच्या माध्यमातून महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग साकारले जाणार आहेत. ही बाब शहरासाठी भूषण ठरणार आहे. अशा प्रकारच्या विविध माध्यमातून महापालिका महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील.

पिंपरी येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य संतोष लोंढे यांनी केले तर के.एस.बी. चौक येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य तुषार हिंगे यांनी केले. सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. आभार नगरसदस्य केशव घोळवे यांनी मानले.

सुमारे ७ कोटी २८ लाख रुपये खर्च करुन राजर्षी शाहू पुतळ्याजवळ शाहू सृष्टीतील विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित म्युरल्स तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कुस्ती आखाडा, हत्तींची लढाई, गावांचे म्युरल, शाळेचे म्युरल, तलाव आदी बाबींचा समावेश आहे. सुमारे १६ कोटी ५७ लाख रुपये खर्च करुन पिंपरी येथील फुले सृष्टीमध्ये महात्मा फुले पुतळ्या शेजारी ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणायक म्युरल बसविण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *