Pimple Gurav News : मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करताना अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष का ?

मोरया पार्ककडे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा
माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी
Pckhabar-पिंपळे गुरवमधील साठ फुटी रस्त्याकडून मोरया पार्क गल्ली क्रमांक 1 ते 6 कडे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करताना अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष का, असा सवालही राजेंद्र जगताप यांनी केला आहे.
मोरया पार्कच्या सर्व गल्ल्यांना जोडणारा मुख्य रस्ता गेल्या वर्षभरापासून सततच्या दुरुस्त्यांमुळे नागरिकांमध्ये चर्चेचा बनला आहे. या परिसरातली ड्रेनेज लाईन सतत तुंबत होती. त्यामुळे वर्षभरापूर्वी रस्ते खोदाई करून ड्रेनेज लाईन टाकण्यात आली. मात्र, नवीन ड्रेनेज लाईनचे चेंबर रस्त्याच्या वरच राहिलेले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन जाणे जिकिरीचे बनले आहे. दुचाकी घसरून सतत अपघात होत आहेत.
संपूर्ण पावसाळ्यात रस्त्यावरील वर आलेल्या चेंबरमुळे रस्ता खाली वर झाला असल्याने, तसेच मोठे खड्डे पडून पाणी साठत आहे. परिणामी वाहनचालकांना खड्ड्यांचा व वर आलेल्या चेंबरचा अंदाज न आल्याने वाहनचालकांना, दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. मोरया पार्कच्या अंतर्गत रस्त्याची कामे जैसे थे अवस्थेत आहेत. अर्धवट कामांमुळे घराघरात धूळ जात असल्याने नागरिक वैतागले आहेत.
या अर्धवट रस्त्याच्या कामांबाबत विद्यमान लोकप्रतिनिधींकडे तक्रार केल्यास तेवढ्यापुरते येऊन पाहणी करतात. मात्र, त्यानंतर काहीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुळात मोरया पार्ककडे जाणारा रस्ता अरुंद आहे. त्याच रस्त्याच्या कडेला ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. हे अन्यत्र हलविल्यास रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत होईल.
खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचून चिखल झाल्याने नागरिकांना पायी चालणे देखील जिकिरीचे बनले आहे. पाय घसरून पडून नागरिक जखमी होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
मुख्य रस्त्यांची कामे करता करता नाकी नऊ आलेल्या महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना मोरया पार्कच्या सर्व गल्ल्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्यांची खोदाई करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही. विद्यमान नगरसेवकांना नागरिकांच्या तक्रारीची दखल घ्यायला वेळ नाही, याचे आश्चर्य वाटते. मोरया पार्क गल्ली क्रमांक 1 ते 6 कडे जाणारे रस्ते दुरुस्त करून नागरिकांची या समस्येतून सुटका करावी .
-राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस











Leave a Reply