Sports News : टी२० विश्वचषकात न्यूझीलंडला फायनलचे तिकीट;  इंग्लंडवर दणदणीत विजय 

Sports News : टी२० विश्वचषकात न्यूझीलंडला फायनलचे तिकीट;  इंग्लंडवर दणदणीत विजय

Pckhabar-  न्यूझीलंडच्या मिशेलने जबरदस्त फटकेबाजी करून टी२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ गडी राखून पराभव केला. अबुधाबी येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने ६ चेंडू राखून १६७ धावांचे आव्हान पूर्ण केले.

त्यामुळे न्यूझीलंडने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. न्यूझीलंडच्या विजयात डॅरेल मिशेलचा मोलाचा वाटा होता, त्याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. जिमी नीशमनेही ११ चेंडूत २७ धावा करत संघाचा विजय निश्चित केला.

टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लड संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत हरला आहे. यापूर्वी टी२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने खेळलेल्या दोन उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय प्राप्त केला होता. २०१० सालच्या टी२० विश्वचषकात इंग्लड संघाने उपांत्य सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला होता. २०१६ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लडने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

या सामन्यात शेवटच्या २४ चेंडूत न्यूझीलंडला ५७ धावांची गरज होती. पण, नीशम आणि मिशेलच्या जबरदस्त खेळीमुळे न्यूझीलंड संघाने एक षटक राखून सामना जिंकला. नीशमने ११ चेंडूत १ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या. त्याचवेळी मिशेलने ४७ चेंडूत चार चौकार आणि चार षटकार ठोकले आणि नाबाद ७२ धावा केल्या. मिशेलचे टी२० क्रिकेटमधील हे पहिलेच अर्धशतक आहे. दोन्ही खेळाडूंनी पाचव्या विकेटसाठी अवघ्या १७ चेंडूत ४० धावांची भागीदारी केल्याने सामन्याचा रंग बदलला.

तत्पूर्वी, मिशेल आणि डेव्हॉन कॉनवे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे न्यूझीलंडने विजयाचा पाया रचला होता. कॉनवेने ३८ चेंडूत ४६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार, एक षटकार ठोकला. इंग्लडने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात १६६ धावा केल्या होत्या. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंड संघाच्या स्वप्नावर  पाणी फेरले आहे.

दरम्यान,  आज दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाविरोधात फायनल सामना न्युझीलँड विरुद्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *