Pimpri News : रंगयात्री महोत्सवाचे उद्या उद्घाटन; पैस रंगमंचावर होणार कलाविष्कार सादर

Pimpri News :

रंगयात्री महोत्सवाचे उद्या उद्घाटन; पैस रंगमंचावर होणार कलाविष्कार सादर
Pckhabar-थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने आयोजित रंगयात्री (रसिककला सेतू) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोनानंतर पुन्हा नाट्यगृह खुली होत असून कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याकरिता संस्थेच्या वतीने हा महोत्सव आयोजित केला असून प्रेक्षकांना सलग १५ दिवस भरगच्च कार्यक्रम असणार आहे असे आयोजक प्रभाकर पवार यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह बंद असल्याने प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर कलाकारांना आपली कला सादर करता आली नाही. त्यामुळे तब्बल काही महिन्यांनंतर नाट्यगृह खुली होत असल्याने कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणणारा ‘रंगयात्री- रसिक कला सेतू’ महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे. या महोत्सवामुळे १५ दिवसांत २५ हून अधिक संस्था आणि २५०-  ३०० कलाकारांची कला अनुभवता येणार आहे. हा महोत्सव संस्थेच्या चिंचवड येथील ‘पैस रंगमंचा’वर कोविडसंबंधी सर्व काळजी घेऊन मोजक्या प्रेक्षक उपस्थितीत संपन्न होणार आहे. प्रेक्षक आणि कलाकारांसाठी हा महोत्सव नि:शुल्क आहे.

 महोत्सवाच्या पहिल्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता महापौर माई ढोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आयुक्त राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर पं. डॉ. नंदकिशोर कपोते यांची प्रकट मुलाखत साहित्यिक श्रीकांत चौगुले घेणार आहे. यावेळी पं. कपोते यांच्या शिष्यांचे कथक सादरीकरण होईल.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी २३ ऑक्टोबरला सायं ५ ते ८ यावेळात लोकनृत्य, लावणी, गझलसंध्या(गझलपुष्प) सादर होईल. तर २४ ऑक्टोबर रोजी जोगवा\गोंधळ (स्वरमुग्धा भजनीमंडळ), त्यानंतर काव्य, गझल, नाट्यप्रवेश सादर होईल. सोमवार २५ ऑक्टोबर रोजी विनोदी आणि विडंबन कविता (पिंपरी चिंचवड साहित्य मंच) यांचे सादरीकरण होईल. यावेळी ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांची प्रकट मुलाखत रंगकर्मी सुहास जोशी घेणार आहे. मंगळवार २६ ऑक्टोबरला कथाअभिवाचन, चंद्र..चाफा..खोबरेल..व्हिस्की( रुद्रंग) आणि  त्यानंतर अपवाद आणि नियम (ललित कला केंद्र) यांचे नाटक होईल. बुधवार २७ ऑक्टोबरला शब्दबिंब(कलाघर), कथाकथन, रंगभूमीथपथ(कारभारी प्रोडक्शन) यांचा दिर्घांक होणार आहे.

 गुरुवारी २८ ऑक्टोबरला शास्त्रीय गायन(अभयसिंह वाघचौरे) होईल. त्यानंतर ज्येष्ठ नाट्य कलावंत  डॉ. रविंद्र घांगुर्डे, ड़ॉ.वंदना घांगुर्डे यांची प्रकट मुलाखत श्रीकांत चौगुले घेणार आहे. शुक्रवारी २९ ऑक्टोबरला लोकनृत्य, नाट्यगीते आणि अभंग (नादवेध संस्था), कथावाचन (नवयुग साहित्य मंच) होईल. शनिवारी ३० ऑक्टोबरला ओडिसी नृत्य (नाद ओडिसी नृत्यालय) , रंगयात्रींशी परिसंवाद होणार असून यावेळी ललित कला केंद्राचे प्रमुख प्रविण भोळे उपस्थित राहतील. रविवारी ३१ ऑक्टोबरला ज्येष्ठ लोककलावंत संजीवनी मुळे यांची प्रकट मुलाखत श्रीकांत चौगुले घेतील. त्यानंतर गॅम्बिट अँड द ग्रिफ्टर (थिएटर वर्कशॉप कंपनी) नाटक सादर होईल.

तर १ नोव्हेंबर रोजी थिएटर वर्कशॉप कंपनीच्या बालकलाकारांचे मुकनाट्य, भरतनाट्यम (कलाश्री संस्था), आठवणींचा गाव – अभिवाचन,  सावल्या (परिमल संस्था) नाटक सादर होईल. तर २ नोव्हेंबरला कथकनृत्य (रुपक नृत्यालय),  नाट्यअभिवाचन, तबर्रुक नाटक सादर होईल. तसेच ३ नोव्हेंबरला जेष्ठ रंगभूषाकार- बाळ जुवाटकर यांची प्रकट मुलाखत रंगकर्मी सुहास जोशी घेतील. झंकार महाराष्ट्राचा (संजिवनी महिला शाहिरी पथक),

थिएटर वर्कशॉप कंपनीच्या मकबूल नाटकातील निवडक नाट्यप्रवेश सादर होणार आहे. तसेच ४ नोव्हेंबरला दिवाळी पहाट सकाळी ७.०० ते ९.३० या वेळात होणार असून दिवाळी पहाट (कथक), श्रेया कालेकर (नृत्य), काव्यपहाट – (समरसता साहित्य परिषद) असा कार्यक्रम असेल. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ५ नोव्हेंबरला दुपारी ३ ते ६ या वेळात वाघाची गोष्ट- नाटक (ललित कला केंद्र) सादर होईल आणि त्यानंतर रंगकर्मी सन्मान  आणि रंगयात्रींशी संवाद होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *