
Pimpri News : स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार;
खासदार संजय राऊत यांचे किरीट सोमय्या यांना ‘ईडी’ कडे तक्रार करण्याचे आव्हान
भाजपला ‘स्मार्ट’ भ्रष्टाचार भोवणार?
Pckhabar- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करून ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कडे तक्रार करत सुटले आहेत. ईडीही तत्परतेने सोमय्या यांच्या आरोपाची दखल घेऊन महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई करते. त्यामुळे आता भाजपच्या ताब्यातील असणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची सोमय्या यांनी ईडीकडे तक्रार करावी, असे थेट आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना दिले आहे.
या संदर्भात संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. या प्रकरणी ईडी किंवा सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी राऊतांनी किरीट सोमय्या यांच्याकडे केली आहे. राऊत म्हणाले, तुम्ही दररोज वेगवेगळे आरोप करत असतात. त्यामुळेच एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. माझ्या पिंपरी-चिंचवडमधील दौर्यात काही नेत्यांनी मला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली. त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्रे हाती लागली. त्यानुसार, 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, टेंडर आणि यातील कंडिशन क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी करण्यात आली, असा दावा राऊत यांनी केला.
‘या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, त्यांनी 50 टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा पाण्यात बुडवला आहे. या कंपनीच्या कंत्राटाचा जास्त फायदा झाला आहे, त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीची मागणी करा. भष्टाचार म्हटले की लोकांना तुम्हीच आठवता. ही फाईल मी ईडीला देण्याएवजी तुम्हाला देत आहे. कारण तुम्ही दिलेल्या तक्रारीवर एजेंसी तत्परतेने काम करतात. तुम्हाला धन्यवाद कारण तुमच्यामुळे अनेक अधिकारी आणि नेते जेलमध्ये गेले आहेत. तुम्ही त्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्र तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला. या प्रकरणी तुम्ही ईडीकडे चौकशीची मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बुधवारी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची सर्व पक्षीय नगरसेवकांनी चौकशी करण्याची मागणी केली. तसेच स्मार्ट सिटीतील संचालकांवर गंभीर आरोप करण्यात आले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक प्रचारात भाजपच्या ‘स्मार्ट’ भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.










Leave a Reply