Pimpri political News : आमदार जगताप, लांडगे यांच्या मनमानी, हुकूमशाही कारभाराने नगरसेवक त्रस्त !
भाजप नगरसेवकाचा लेटर बॉम्ब
दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील

Pckhabar- पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे महापालिकेतील कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून त्यांच्या या कारभाराला भाजपचे अनेक नगरसेवक त्रस्त आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगरसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यांच्या अनेक चुकीच्या कामांमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त करत याबाब भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र ई-मेल केले आहे. मात्र, कामटे यांच्या या लेटर बॉम्बमुळे शहर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली असून भाजपमधील अंतर्गत वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.
दरम्यान, भाजप नगरसेवकांनेच महापालिकेत गैरव्यवहार झाल्याचे एक प्रकारे मान्य केल्याने शहर भाजपमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच स्व पक्षाचे आमदारांबाबत असे पत्र काढल्यामुळे दोन्ही आमदार समर्थक नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे.
फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नगरसेवक कामठे यांनी म्हटले आहे की, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याचा आपल्या सर्वांचाच मानस आहे. पण, गेल्या 5 वर्षांमध्ये शहरातील भाजपचे आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या अनेक चुकीच्या कामांमुळे येत्या निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. या आमदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे खापर विरोधी पक्ष व जनता महापालिकेतील आपल्या नगरसेवकांवर फोडणार हे निश्चित आहे. लांडगे व जगताप यांनी शहरात मनमानी व हुकूमशाही पद्धतीने महापालिकेत हस्तक्षेप करत अनेक नगरसेवकांना त्रस्त केले. त्यामुळे आपल्याच पक्षातील काही नगरसेवक यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे आपण येत्या महापालिका निवडणुकीत तिकीटवाटपाच्या संदर्भात लांडगे गट किंवा जगताप गटाचा समर्थक, नातेवाईक किंवा स्नेही म्हणून निर्णय न घेता भाजपच्या मेहनती सर्वसामान्य सच्च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी.
राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांकडून मी भाजपच्या आमदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून भाजप पक्ष सोडणार असल्याची चर्चा सध्या शहरात चालू आहे. पण, मी भाजपच्या कोणत्याही आमदाराच्या गटातील नाही म्हणून नव्हे तर भाजपचा एक सच्चा शिलेदार म्हणून काम करतो आहे. दोन आमदारांनी चुकीची कामे केली आहेत ते कदाचित स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पक्षाचा त्याग करू शकतात, तशी शक्यताही सध्या वर्तवली जात आहे. पण, मी भाजपच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजकारण करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम पक्षाशी एकनिष्ठ राहणार असून पक्षाचे होणारे नुकसान पाहू शकत नाही. हे दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील. परंतु, नवीन कार्यकर्ता केव्हा ही पक्ष बदलू शकत नाही, असे नगरसेवक कामठे यांनी पत्रात म्हटले आहे.






Leave a Reply