Pimpri News: ‘छटपूजा’ उत्सवाबाबत शहरातील उत्तर भारतीय नागरिक संभ्रमात

Pimpri News: ‘छटपूजा’ उत्सवाबाबत शहरातील उत्तर भारतीय नागरिक संभ्रमात

पालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत

 

Pckhabar- पिंपरी – चिंचवड शहरात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शहरात साधेपणाने ‘छठ पूजा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या शहरात कोरोनाचा जोर ओसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख देखील कमी होतोय. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘छटपूजा’ उत्सवाबाबत मार्गदर्शक सूचनाप्रणाली जाहीर करावी, अशी मागणी हनुमान मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी पालिका आणि पोलीस आयुक्त कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विजय गुप्ता यांनी त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात उत्तर भारतीय नागरिक गेल्या २५ ते ३० वर्षांपासून छठपूजेचा कार्यक्रम उत्सवात साजरा करतात. स्थानिक नागरिकदेखील यात सहभागी होतात. दिवाळीनंतर ४ ते ६ दिवसांनी ‘छठपूजा’ उत्सव साजरा होत आहे. या चार दिवसीय उत्सवाला येत्या ८ नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार असून, त्यात महाव्रत आरंभ (नहाय खाय), ९ नोव्हेंबर रोजी छोटकी छठ (रसियाव रोटी) (खरना), १० नोव्हेंबर रोजी बड़की छठ (संध्या अर्घ) आणि उत्सवाची समाप्ती अंतिम दिनी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी पारण (प्रात: अर्घ) या महोत्सवाने संपन्न होणार आहे.

त्यानिमित्त हनुमान मित्र मंडळाच्या वतीने शहरातील पवना नदी किनारी, बिर्ला हॉस्पिटल रस्ता (हॉटेल रिव्हर ह्यु, गणपती विसर्जन घाट) या निवडक नद्यांच्या घाटावर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. परंतु, वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे उत्तर भारतीय नागरिक संभ्रमात आहेत. या उत्सवास कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये; अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सुरक्षाही महत्वाची आहे. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी या निवेदनाची दखल घेऊन, येत्या दोन दिवसात छटपूजा उत्सवाबाबत मार्गदर्शक कार्यप्रणाली जाहीर करावी, असे या निवेदनात गुप्ता यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *