Talegaon Dabhade News : पोस्टाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा : मधुमिता दास

Talegaon Dabhade News : पोस्टाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा : मधुमिता दास

नगरसेवक निखिल भगत यांच्या प्रयत्नातून स्टेशन पोस्ट ऑफिसचा कार्यारंभ
Pckhabar- लोकांच्या कल्याणाच्या अनेक योजना पोस्ट खात्याने आखल्या आहेत. त्या यशस्वी करण्यासाठी लोकांची साथ आवश्यक आहे. कोरोना काळात सर्व व्यवहार बंद होते. परंतु पोस्ट खात्याची सेवा मात्र न घाबरता चालू होती. आमच्या सर्व योजना लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाच्या पोस्टमास्तर जनरल जी. मधुमिता दास यांनी येथे केले. तळेगाव स्टेशन विभागासाठी तपोधाम कॉलनीमध्ये नवीन पोस्ट ऑफिस सुरू झाले असून त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, नगरसेवक निखिल भगत, सामाजिक कार्यकर्ते विश्वास देशपांडे व पुणे जिल्हा ग्रामीणचे डाकघर अधीक्षक प्रमोद भोसले होते.

मधुमिता दास पुढे म्हणाल्या की, पोस्टात रक्कम गुंतविणे हे अत्यंत सुरक्षित आहे. ज्येष्ठ नागरिकांना आम्ही घरपोच सेवा देत असतो. आता केवळ आधार कार्डावरून खाते काढता येते. दीर्घ मुदतीचा विमा हाही फायद्याचा आहे. त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या आयुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

सुरेश साखवळकर म्हणाले की, गेली साडेतीन वर्षे स्टेशन परिसरातील नागरिकांना पोस्टाअभावी विलक्षण गैरसोय सहन करावी लागली. तथापि नगरसेवक निखिल भगत यांच्या विशेष प्रयत्नांमधून व स्वखर्चातून या नव्याने सुरू होत असलेल्या पोस्टाचा कार्यारंभ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नवी वास्तू सुरक्षित व प्रशस्त असल्याबद्दल खात्याला धन्यवाद द्यावे लागतील.

नगरसेवक निखिल भगत, विश्वास देशपांडे यांनीही विचार व्यक्त केले. जिल्हा ग्रामीण डाकघर अधीक्षक प्रमोद भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक, गणेश वाडूरकर यांनी आभार प्रदर्शन केले तर संगीता दाते यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठांच्या तसेच पोस्टाशी संबंधित असणार्‍या नागरिकांच्या रोजच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघाला असून या सामाजिक प्रश्नाची जाण नगरसेवक निखिल भगत यांनी राखली असल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

कार्यक्रमास नगरसेविका कल्पना भोपळे, उमाकांत कुलकर्णी, अरविंद करंदीकर, निरंजन जहागिरदार, अ‍ॅड. संविद पाटील, मधुकर बासरकर, सौ. उर्मिला बासरकर, सुरेश झेंड, उद्धव जुंदरे, प्रकाशराव जोशी व अन्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *