

IPL News : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएलमधून आऊट; कर्णधार विराटचे स्वप्न भंगले
Pckhabar-इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील एलिमेनेटरचा सामना सोमवारी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ४ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्याच्या आशा जिवंत ठेवल्या. क्वालिफायर २ च्या सामन्यात त्यांची लढत दिल्ली कॅपिटल्सशी होईल. कोलकाताच्या या विजयाचा नायक सुनील नारायण ठरला.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २० षटकांत ७ बाद १३८ धावा केल्या आणि विजयासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर १३९ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १९.४ षटकांत ६ विकेट्स गमावत पूर्ण केला.
कोलकाताकडून शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने डावाची सुरुवात केली होती. या दोघांनी सकारात्मक सुरुवात करुन दिली. पण त्यांची जोडी मैदानात जमली असे वाटत असतानाच गिलला हर्षल पटेलने बाद केले. त्याने २९ धावा केल्या. पाठोपाठ ७ व्या षटकात राहुल त्रिपाठीला युजवेंद्र चहलने पायचीत केले. त्याला पंचांनी सुरुवातीला नाबाद दिले होते. पण, बेंगलोरने डीआरएसचा वापर केला, ज्यात तो बाद असल्याचे दिसला. त्यामुळे त्याला ६ धावांवर माघारी परतावे लागले.
यानंतर व्यंकटेश अय्यरला नितीश राणाने चांगली साथ दिली होती. पण व्यंकटेशला ११ व्या षटकात हर्षल पटेलने २६ धावांवर बाद केले. पण त्यामुळे सुनील नारायण फलंदाजीला आला. त्याने फलंदाजीला येताच आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने १२ व्या षटकात डॅनियल क्रिश्चियनविरुद्ध ३ षटकार मारत कोलकाताला सामन्यात पुनरागमन करुन दिले.
पण, दुसऱ्या बाजूने फलंदाजी करत असलेला नितीश राणा १५ व्या षटकात चहलच्या फिरकीचा शिकार ठरला. त्याने २३ धावा केल्या. कोलकाता विजयाच्या जवळ असताना नारायणनेही आपली विकेट गमावली. त्याला १८ व्या षटकात मोहम्मद सिराजने २६ धावांवर त्रिफळाचीत केले. याच षटकात दिनेश कार्तिकही १० धावांवर यष्टीरक्षक श्रीकर भरतकडे झेल देऊन बाद झाला.
पण अखेर शाकिब अल हसन आणि कर्णधार ओएन मॉर्गनने अखेरच्या षटकात कोलकाताला विजयापार नेले. मॉर्गनने नाबाद ५ आणि शाकिबने नाबाद ९ धावा केल्या.
बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
सुनील नारायणच्या फिरकीत अडकले दिग्गज
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगलोरकडून कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी उतरले. या दोघांनीही चांगली सुरुवात करताना ४९ धावांची सलामी दिली. पण लॉकी फर्ग्युसनने ६ व्या षटकात पडीक्कलला त्रिफळाचीत केले. तो २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर मागील सामन्यातील बेंगलोरच्या विजयाचा हिरो श्रीकर भरत १० व्या षटकात सुनील नारायणच्या गोलंदाजीचा शिकार झाला. त्याला ९ धावाच करता आल्या.
त्याच्यापाठोपाठ नारायणने विराट कोहलीला १३ व्या षटकात ३९ धावांवर त्रिफळाचीत केले. तर, १५ व्या षटकात एबी डिव्हिलियर्सला ११ धावांवर नारायणने त्रिफळाचीत करत बेंगलोरला मोठे धक्के दिले. नारायणने १७ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेललाही माधारी धाडले. मॅक्सवेलने १५ धावा केल्या. त्यामुळे बेंगलोरच्या धावगतीला चांगलाच लगाम लागला. १९ व्या षटकात शहाबाद अहमद देखील फर्ग्युसनच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्याने १३ धावा केल्या.
अखेरच्या षटकात डॅनियल क्रिश्चियन ९ धावांवर धावबाद झाला. अखेर हर्षल पटेलने नाबाद ८ धावांवर राहात बेंगलोरला २० षटकांत १३८ धावांवर पोहचवले.
कोलकाताकडून सुनील नारायणने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच लॉकी फर्ग्युसनने २ विकेट्स घेतल्या.







Leave a Reply