Article By Dr. Trunali thackeray – Wankhade ‘मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या अति वापरामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ चा धोका!
डॉ. तृणाली रो. ठाकरे-वानखडे
एम.एस. (नेत्र)
Pckhabar-डोळा ही देवाची अशी नैसर्गिक देण आहे ज्यामुळे आपण या विश्वातील सर्व निर्मिती, वस्तू, रंग बघू शकतो. आजच्या आधुनिक जगात मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप व इतर गॅजेट्स या पिढीच्या जीवनावश्यक गरजा बनल्या आहेत. त्यासोबत या कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण व्यवस्थेमुळे लहान मुलांमधील लॅपटॉप, मोबाईलचा वापर वाढत आहे. पण या गॅजेट्सचा वापर करताना होत असलेल्या चुकांमुळे कॉम्पुटर व्हिजन सिंड्रोम या आजाराला सामोरे जावे लागत आहे. बराच वेळ कॉम्पुटर व इतर गॅझेट पुढे बसून राहिल्यामुळे डोळ्यांशी आणि दृष्टीशी संबंधित काही आजार उद्भवतात या आजारांच्या ग्रुपला कॉम्पुटर व्हिजन सिंड्रोम म्हटले आहे.
सातत्याने मॉनिटर किंवा स्क्रीन कडे पाहिल्यामुळे डोळ्यांची उघडझाप कमी होते व त्यामुळे डोळ्यातील ओलावा कमी होण्याचे प्रमाण वाढते.
*उद्भवणारे लक्षणे*
डोके दुखी, धूसरदृष्टी, मान दुखी, डोळे लाल होणे, थकवा, डोळ्यांवरील ताण, कोरडेपणा, प्रकाशाचा होणारा त्रास, असे काही लक्षणे साधारणता या आजारांमध्ये उद्भवतात.
ही लक्षणे का उद्भवतात?
ऑफिसात वा घरातील अपुरी लाईट व्यवस्था किंवा त्यांचे चुकीचे नियोजनामुळे डोळ्यावर ताण पडतो.
स्क्रीन वरील ग्लेअर, कॉम्पुटर पासून जास्त दूर अंतरावर बसणे, बसण्याची चुकीची पद्धत यामुळे लक्षणे बळावू शकतात.
मॉनिटर वरील काम थांबल्यानंतर ही लक्षणेही थांबतात.
बऱ्याचदा यूजर्समध्ये ही लक्षणे तात्पुरत्या स्वरूपाची असतात.
त्यानंतर काही जणांना मात्र दृष्टीची क्षमता कमी झाल्याचा अनुभव बर्याच वेळा येतो.
त्यावर वेळीच उपचार न केल्यास आजार बळाविण्याची शक्यता असते.
अनेकदा अशा व्यक्ती कॉम्पुटरकडे जास्त झुकून काम करत असतात व त्यातून मान पाठ व खांदे दुखी उद्भवत असते.
दररोज सलग दोन तास आणि दोन तासांपेक्षा जास्त वेळ काम करणाऱ्यांमध्ये या सिंड्रोमची लक्षणे जास्त दिसतात.
बसण्याची व मॉनिटर ची व्यवस्था कशी असावी?
रेफरन्स मटेरियल हे की – बोर्डाच्या वरील बाजूला आणि मॉनिटरच्या खाली असावे.
त्याऐवजी डॉक्युमेंट होल्डरचा सुद्धा उपयोग करू शकतो.
काम करत असताना रेफरन्स मटेरियल किंवा डॉक्युमेंट्स पाहताना डोक्याची फार हालचाल करावी लागणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी लागते.
खिडकीतून अथवा डोक्यावरच्या भागातून मॉनिटरवर तीव्र प्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
बचाव कसा करावा
चष्मा लावून काम करण्याची सवय करावी.
कंप्यूटर, मोबाइल व इतर गॅजेट्सचा वापर अंधारात करू नये.
त्यासाठी मॉनिटरवर अँटी ग्लेअर स्क्रीनही लावता येऊ शकते.
हा आजार बळवण्याच्या कारणांमध्ये आपली बसण्याची व्यवस्था ही महत्त्वाची असते.
आपले तळवे जमिनीवर टेकवता येतील अशा पद्धतीने आपल्या खुर्चीची व्यवस्था ठेवावी.
सर्वसाधारण नजर खाली झुकेल अशा लेव्हल वर कम्प्युटर अथवा स्क्रीन असावी.
डोळ्यांवरील ताण टाळण्यासाठी कम्प्युटरवर काम करताना किमान पंधरा मिनिटांचा ब्रेक घ्यावा.
तसेच प्रत्येक वीस मिनिटानंतर वीस सेकंद कंप्यूटर कडे न बघता अन्यत्र पहावे व डोळ्यांची उघडझाप करावी जेणेकरून डोळ्यांचा ओलसरपणा कायम राहील.
वरीलप्रमाणे खबरदारी घेतल्यास डोळ्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेता येऊ शकते. याबाबत कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला व त्यासंबंधी उपचार करून घ्यावा.
डॉ. तृणाली रो. वानखडे
एम.एस. (नेत्र )






Leave a Reply