Maharashtra News : पोलीस उपअधीक्षक आर. आर पाटील सेवानिवृत्त; पुतण्या रोहित पाटीलची भावनिक फेसबुक पोस्ट

Maharashtra News : पोलीस उपअधीक्षक आर. आर पाटील सेवानिवृत्त; पुतण्या रोहित पाटीलची भावनिक फेसबुक पोस्ट
Pckhabar- कोल्हापूर येथील करवीरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. राजाराम पाटील हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री आर आर पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत. याबद्दल त्यांचा पुतण्या आणि दिवगंत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर आपल्या काकांबद्दल एक पोस्ट लिहिली आहे.

रोहित पाटील आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात,  आज माझे मोठे चुलते राजाराम (तात्या) पाटील सेवानिवृत्त होत आहेत. व्यक्तिगत माझ्या आयुष्याला बहुतांश आकार आणि शिकवण ज्यांनी दिली त्या तात्यांची आज सेवानिवृत्ती.

कुटुंब म्हणून आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आहे आणि त्याची पार्श्वभूमी सुध्दा काहीशी तशीच आहे. सुरुवातीच्या काळात भरती पूर्व परीक्षेत पास झाल्यानंतर ज्यावळेस ही बातमी त्यांनी आबांच्या कानावर घातली होती. त्यावेळेस आबांच्या डोळ्यातून अश्रू आलेला किस्सा आज सुध्दा सांगताना त्यांचे डोळे भरून येताना मी पाहिलं आहे. घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान होता. आबा गृहमंत्री असताना कधीही गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता त्यांनी काम केले आणि नेहमीच त्यांनी ते अंतर ठेऊन काम केले. सेवेतला बहुतांश काळ हा साईड पोस्टिंग मध्येच काम त्यांनी केले आणि कधीही आबांकडे त्यांनी कोणती मागणी केली नाही. हे मात्र अगदी ठळकपणे सांगायला मला आवडेल. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे लक्षात येतं.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी तयार केलेला लोकांचा संग्रह आणि तेथील लोकांना त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हीच त्यांच्या कामाची पोच पावती आहे असं मला नेहमी वाटतं. आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या माझ्या आज्जीला सॅल्यूट करून ते रवाना झाले.

आर आर आबांचा मुलगा म्हणून जेवढा अभिमान आहे तितकाच आभिमान डी.वाय.एस. पी आर आर तात्यांचा पुतण्या म्हणून आहे आणि राहील एवढच आजच्या दिवशी मला त्यांना सांगायचंय.
Have a happy and healthy retirement TATYA..

दरम्यान, राजाराम रामराव पाटील हे तात्या म्हणून परिचीत आहेत. भाऊ मंत्री होता, वहिनी आमदार, घरी मोठा राजकीय वारसा, तरीही तात्यांनी त्याचा बडेजाव केला नाही. राजाराम पाटील हा पोलीस दलातील अत्यंत साधा-सरळ माणूस म्हणून ओळखले जातात. कामावरील निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांनी पोलीस दलात आपला वेगळा लौकीक जपला.

राजाराम पाटील यांची निष्ठा आणि कामातील तत्परतेसाठी त्यांना दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं. राजाराम पाटील यांचा सख्खा भाऊ आर आर आबा हे 12 वर्षे गृहमंत्री होते. मात्र तरीही तात्यांनी कधी त्याचा टेंबा मिरवला नाही. राजाराम पाटील हे कोल्हापुरात येण्यापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली होती. ज्यावेळी त्यांची पिंपरीतून बदली झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *