Dehu News : चेंबर तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास; उपाय योजना करा,अन्यथा तीव्र आंदोलन
भाजपचे संतोष हगवणे यांचा इशारा
Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूमधील विठ्ठलनगर ते मुख्य कमानपर्यंत विविध ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत झालेल्या भुयारी गटारी चेंबर बऱ्याच ठिकाणी तुंबलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना रोगराई आणि दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास देहू भाजपच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा स्वच्छ भारत अभियानाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष हगवणे यांनी दिला आहे.
याबाबत हगवणे यांनी देहूगाव नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी अंकुश जाधव, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विठ्ठलनगर येथील लिमजाई मंदिरामागे भुयारी गटाराच्या चेंबरमधून पाणी बाहेर येत असल्यामुळे देहू-आळंदी मुख्य रस्त्यावर सर्व पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिक , यात्रेकरूंना अपघात होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद विठ्ठलनगर समोरील बाजीराव काळोखे गल्ली, कृष्णाई डेअरीच्या मागेही भुयारी गटारे बंद असल्यामुळे सर्व दुर्गंधीयुक्त पाणी त्या रहिवासी सोसायटीमध्ये जात आहे.
सह्याद्री सोसायटी आणि मुख्य कामाने समोरील जिल्हा परिषद शाळे शेजारी बंदिस्त गटार बंद झाले आहे. या सर्व ठिकाणाची भुयारी गटारांची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी. इंद्रायणी नदीवर बसवलेला एसटीपी प्लॅन्ट बहुतांश वेळा बंद असतो. त्यामुळे पवित्र अशा इंद्रायणी नदीत घाण पाणी जात असून नदी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. या भुयारी गटारच्या कामासंदर्भात दोन महिन्यापूर्वी निवेदन पत्र दिले होते. परंतु आजतागायत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. भुयारी गटारच्या कामासंदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास देहू भाजपच्या वतीने नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हगवणे यांनी दिला आहे.
याबाबत भाजपा स्वच्छ भारत अभियानाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष हगवणे म्हणाले” देहू हे तीर्थक्षेत्र असून श्री संत तुकाराम महाराज यांची पवित्र भूमी आहे. मात्र, देहूगावात भुयारी गटर चेंबर बऱ्याच ठिकाणी तुंबलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांना, नागरिकांना रोगराई आणि दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.”










Leave a Reply