Pimpri News : भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा
Pckhabar-महापालिकेच्या स्थायी समितीतील लाच प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पिंपरी चौकात जागरण गोंधळ आंदोलन करून महापालिकेवर मोर्चा काढला. “स्थायी समिती बरखास्त करा”, “नही चलेगी, नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या आंदोलनात पोतदार, नंदीबैल, वासुदेव, गोंधळी सहभागी झाले होते. त्यानंतर महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला आघाडी शहराध्यक्ष वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका वैशाली घोडेकर, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, युवा नेते संदीप पवार, स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे, भाउसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, प्रवक्ते फझल शेख, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष यश साने, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे यांनी भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत. सत्ताधारी भाजपाचा निषेध करावा. निवडणूक आता सहा महिन्यांवर आली आहे. राष्ट्रवादी सत्तेत येणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे म्हटले त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, लाचलुचपत विभागाची कारवाई झाली त्यावेळीच राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे सदस्य दोषी असतील तर तात्काळ राजीनामे घेण्यात येतील. आता माजी आमदार विलास लांडे यांनीही मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्याक्षणी संबंधित सदस्यांचे राजीनामे घेण्यात येतील.
दरम्यान, महापालिका सुरक्षारक्षकांनी राष्ट्रवादीचा मोर्चा प्रवेशद्वारात रोखला. सुरक्षा अधिकारी आंदोलनकर्त्यांना प्रवेश देत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणा आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.







Leave a Reply