Pimpri News: ’त्या’ 16 जणांची माहिती देण्यास टाळाटाळ, उडवाडवीची उत्तरे

Pimpri News: ’त्या’ 16 जणांची माहिती देण्यास टाळाटाळ, उडवाडवीची उत्तरे
लाचखोर आरोपींचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला
Pckhabar- लाच प्रकरणात अटकेत असलेले आरोपी स्थायी समिती अध्यक्षांसह त्यांचे स्वीय सहाय्यक तपासात सहकार्य करत नाहीत. मालमत्ताबाबत माहिती देत नसून उडवाडवीची उत्तरे दिली जात आहेत.

कार्यालयात आणि त्यांच्याकडे सापडलेल्या 5 लाख 68 हजार रुपयांच्या रोख रकमेबाबत समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी ’एसीबी’ पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. मात्र, शिवाजीनगर येथील विशेष न्यायालायाने आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

 वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठीचे 1 लाख 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना स्थायीच्या कर्मचार्‍यांना एसीबीने बुधवारी (दि.18) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे,  त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे  (संगणक ऑपरेटर) आणि  अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.19) पहाटे अटक केली.

आरोपींना सुरूवातीला न्यायालयाने दोन दिवसांची म्हणजे आज (शनिवार) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर केले. एसीबीच्या पोलिसांनी आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

न्यायालयाने आरोपी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकून घेत आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीतील वाढीसाठी न्यायालयाला कारणे दिली होती. त्यात फिर्यादीने 3 टक्क्यांमध्ये कमी होऊन 2 टक्के करण्याची विनंती केली असता ज्ञानेश्वर पिंगळे यांनी ते वर 16 जणांना द्यावे लागतात. असे सांगितल्याचे ’रेकॉर्ड’ झाले. याबाबत आरोपींकडे तपास करता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ते 16 जणांची माहिती मिळाल्याशिवाय तपास पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे आरोपींच्या कोठडीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *