Pimpri News : इथे कुणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही, महापालिकेत मल्टी लुटा-लुट सुरू : माकप

Pimpri News : इथे कुणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही, महापालिकेत मल्टी लुटा-लुट सुरू : माकप

सर्व विकास कामातील निविदांची चौकशी करण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी

Pckhabar-मनपाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये  कररूपाने  नागरिकांनी भरलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निधी विकासकामांसाठी मिळालेला आहे, 7 हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यातील 48 टक्के रक्कम स्थापत्य विभागासाठी आहे. त्यातूनही टक्केवारी लोकप्रतिनिधी मिळवत आहेत. कोरोना काळात मास्क खरेदीतून स्वतःचे आर्थिक आरोग्य सुधारून घेण्यात आले. गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी समृद्ध झाले आहेत. त्यांची समृद्धी म्हणजे नागरिकांची समृद्धी आणि शहर विकास असेच आता सर्वाना वाटत आहे. स्थायी समितीमध्ये सर्व  पक्षीय नगरसेवक आहेत. स्थायी समिती टक्केवारीचा अड्डा बनल्याचा घणाघाती आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच
सर्व विकास कामातील निविदांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.

याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  बहुसंख्य लोकप्रतिनिधी बांधकाम लॉबीशी संबंधित आहेत. त्यामुळे शहरातील केंद्र सरकारच्या घरकुल योजना रेंगाळत ठेवल्या जातात. खाजगी हॉस्पिटल्सना उत्तेजन देण्यासाठी मनपाच्या आरोग्य, वैद्यकीय विभागाच्या खर्चासाठी कोणतीही विशेष तरतूद केली जात नाही. भाजपच्या भ्रष्ट कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी  परखड भूमिका घेतली नाही. 2020/2021 च्या अंदाज पत्रकातील तरतुदी पाहिल्यावर जिथे चरायला मिळेल तिथेच जास्त आर्थिक तरतूद केलेली आहे.

स्मार्ट सिटीच्या अनेक कामात घोटाळे आहेत. 2012/2017 च्या पंचवार्षिक निवडणुकीत किती पैसा उधळला,या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींच्या आर्थिक समृद्धीची आयकर विभागाने चौकशी करावी. अच्छे दिन कोणाचे आले?पाण्यासाठी, शुद्ध हवेसाठी, चांगल्या रस्त्यासाठी लोकाभिमुख कार्यक्रम नसल्यामुळें नागरिक संतप्त आहेत. करदात्यांच्या स्वप्नाची होळी करून मल्टी लुटालूटीचा झिंग लपापा सर्व जण करत आहेत.

 कोरोनमुळे शाळा बंद आहेत, तरी सुद्धा शाळांसाठी स्वयंपाक घर उपकरणे खरेदी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत. स्मार्ट सिटी, रस्ते, विकास, इत्यादी सर्व कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी सत्ताधारी भाजपला मिळाला आहे. मनपा च्या प्रत्येक प्रभागात ठेकेदारांचे कल्याण करण्यासाठी नियोजनशून्य कामे सुरू आहेत, गरज नसतानाही रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. जनआरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण यामध्ये कोणत्याही मूलभूत सुधारणा केल्या नाहीत. 2017 पासून पंचतारांकित विकासकामे आणि त्याचे ठेके देण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे.

भाजप भ्रष्ट आहे, त्यांचे देशपातळीवर वस्त्रहरण  झालेले आहे. शहरातील विविध विकासकामे अर्धवट आहेत, नागरिक त्रास सहन करत आहेत. मनपा मध्ये मल्टी लुटालूटी चा झिंग लपापा सुरू आहे. इथे कोणी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ राहिलेले नाहीत. इतिहासात प्रथमच धाड पडल्यामुळे शहराच्या नाव लौकिकाला काळिमा फासला गेला आहे. राज्य सरकारने मनपातील सर्व विकास कामाच्या निविदांची (TENDERS) चौकशी करावी अशी मागणी माकपने केली आहे.

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर समितीचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर, गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, अपर्णा दराडे, ख्वाजा जमखाने, सचिन देसाई, वीरभद्र स्वामी, सुकुमार पोन्नपन यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *