
Pimpri News : महापालिकेच्या भ्रष्टकारभाराची सीआयडीमार्फत चौकशी करा: सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर
Pckhabar-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख व भय,भ्रष्टाचार मुक्त पालिका अशी फसवी घोषणा देऊन प्रचार यंत्रणा राबवली होती. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडकरांनी संपूर्ण बहुमत भाजपला देऊन सत्ता सिंहासनावर मोठ्या विश्वासाने बसवले. मात्र सत्तेवर आरूढ होताच पहिल्या स्थायी समिती पासून प्रचंड भ्रष्टाचार, गैरव्यवहार सुरू करण्यात आले. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, कचरा निविदेतील रिंग, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, सिमेंट रस्ते, स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गतासह अशा विविध कामात मोठ्या प्रमाणात भाजपने मोठा भ्रष्टाचार केला आहे. भाजपच्या सत्ता काळातील म्हणजे साडेचार वर्षांच्या कारभाराची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केली आहे.
याबाबत भापकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे इतर कर्मचारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर प्रकार आहे.
शहराच्या विविध विकास कामात भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार भ्रष्टाचार, यामध्ये अधिकारी पदाधिकारी नगरसेवक यांनी नावे, बेनावे आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे ठेके घेऊन महापालिका लुटली आहे.
ऐनवेळचे कोट्यवधीचे विषय आणून त्याला मंजुरी देणे, वाढीव खर्चाला वेळोवेळी मंजुरी देणे, निविदा प्रक्रियेत रिंग करणे, आदि संगणमत करून कोट्यवधी रुपयेला महापालिकेला गंडा घालणे त्यातून कोट्यवधीची माया जमा केली आहे.
महापालिकेच्या लेखा परीक्षणामध्ये 4000 कोटींची रक्कम वादग्रस्त आहे, त्याची हि चौकशी होणे गरजेचे आहे. मागील चार वर्षात स्थायी समिती सभापती व सर्वपक्षीय सदस्यांनी अशाच पद्धतीने टक्केवारीचे गलिच्छ राजकारण करून करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवढवळ्या दरोडे घातले आहेत. त्यामुळे सन 2017 पासून स्थायी समिती सभापती व सर्वपक्षीय सदस्यांच्या निर्णयाची व मालमत्तेची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्यात यावी, ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त करून या महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी मारूती भापकर यांनी केली आहे.






Leave a Reply