
Pimpri Acb Reid News : लाच प्रकरणातील पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
नितीन लांडगे यांच्या घराची घेतली झाडाझडती
कार्यालयात आणि आरोपींकडे सापडली 5 लाख 93 हजारांची रोकड
Pckhabar-पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कामाचे मंजूर झालेले टेंडरची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि तीन लिपिकांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी पिंपरी चिंचवड महापालिकेत करण्यात आली. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच स्थायी समिती अध्यक्षाच्या कार्यालयावर धाड पडल्याने सत्ताधारी भाजपसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे, लिपिक विजय शंभुलाल चावरिया, शिपाई अरविंद भीमराव कांबळे, संगणक चालक राजेंद्र जयवंतराव शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
यातील तक्रारदार हे जाहिरातीचा ठेकेदार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या जागेमध्ये होडींग उभारण्याकरीता त्यांनी भरलेल्या २८ निविदा मंजूर झालेल्या आहेत. परंतु त्यांची वर्कऑर्डर अद्याप न निघाल्याने तक्रारदार हे स्थायी समितीचे सभापती अॅडव्होकेट नितीन ज्ञानेश्वर लांडगे व त्यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना भेटले असता वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी त्या २८ निविदांच्या बोली रक्कमेच्या (बीड अमाउंट) टक्के रक्कम १० लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २ टक्केप्रमाणे सहा लाख रुपये घेण्याचे मान्य केले. ६ लाख रुपयांची मागणी करून त्यापैकी आजरोजी तयार असलेल्या ६ करारनाम्यांच्या फाईल्सवर सही शिक्का देण्याकरीता २ टक्क्याप्रमाणे १ लाख १८ हजार लाच रक्कमेची मागणी करून ती तेथील लिपिक विजय चावरिया, संगणक चालक राजेंद्र शिंदे व शिपाई अरविंद कांबळे यांच्यामार्फत स्वीकारल्यावर या सर्वांना अटक करण्यात आली.










Leave a Reply