Cricket News : ‘लॉर्ड्स’ काबीज; रोमहर्षक लढतीत भारताने इंग्लंडला लोळवले
१५१ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत आघाडी
Pckhabar- नाट्यमय ठरलेल्या लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं वर्चस्व गाजवले. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी जोडीनं ऐतिहासिक खेळी करताना संघाला विजयाचे स्वप्न दाखवले. पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अनपेक्षित कामगिरी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.
आणि भारतीय संघाने रोमहर्षक लढतीत इंग्लंडला लोळवले. पाच कसोटी मालिकेत आघाडी घेतली आहे.
अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी २९७ चेंडूंचा सामना करताना १०० धावांची भागीदारी केली. लॉर्ड्स कसोटीवर भारताकडून चौथ्या विकेटसाठीची ही पहिलीच शतकी भागीदारी ठरली. रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण टीम इंडियाच्या मदतीसाठी शेपूटच धावले. भारतानं ८ बाद २९८ धावांवर दुसरा डाव घोषित केला. इंग्लंडसमोर विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवले. शमी ७० चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६, तर जसप्रीत ६४ चेंडूंत ३ चौकारांसह ३४ धावांवर नाबाद राहिला. जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या जोडीनं नाबाद ८९ धावांची भागीदारी करताना इतिहास घडवला. भारताबाहेरची ९ व्या व १० व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला जसप्रीत व शमी यांनी पहिल्या व दुसऱ्या षटकात धक्के दिले. रोरि बर्न्स व डॉम सिब्ली हे दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले. हसीब हमीद याला रोहित शर्माकडून जीवदान मिळाले, परंतु त्याचा फार मोठा फटका टीम इंडियाला बसला नाही. इशांत शर्मानं त्याची विकेट घेतली आहे. इशांतनं त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टोला ( २) पायचीत करून चौथा धक्का दिला. टी ब्रेकनंतर जसप्रीतनं भारताला हवी ती विकेट मिळवून दिली. इंग्लंडचा कर्णधार जो रूट ३३ धावांवर विराटच्या हाती झेल देऊन माघारी परतला. आता इंग्लंडची पराभव टाळण्याची परीक्षा खऱ्या अर्थानं सुरू झाली होती.
अखेरच्या एका तासाच्या खेळात टीम इंडियाला विजयासाठी ३ विकेट्स हव्या होत्या, तर इंग्लंडला पराभव टाळण्यासाठी ९० चेंडू खेळून काढायची होती. विराटनं आक्रमक क्षेत्ररक्षण लावत दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ५१व्या षटकात जसप्रीतनं राऊंड दी विकेट गोलंदाजी करताना ऑली रॉबिन्सनला पायचीत केले. रॉबिन्सननं ३५ चेंडूंत ९ धावा केल्या. आता भारताला ५५ चेंडूंत २ विकेट्स घ्यायच्या होत्या. पुढच्याच षटकात सिराजनं इंग्लंडची अखेरची होप बटलरला ( २५ धावा ९६ चेंडू) बाद केले. सिराजनं जेम्स अँडरसनची विकेट घेत भारताला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडचा डाव १२० धावांवर गडगडला







Leave a Reply