Pune News : कोरोनावरील मिश्र लशींचे डोस अव्यवहार्य: सीरम समूहाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला

Pune News : कोरोनावरील मिश्र लशींचे डोस अव्यवहार्य: सीरम समूहाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला
Pckhabar-वर्षाला ११० कोटी लशींचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या महिन्याला १० कोटींच्या लशींचे उत्पादन करणे हे सोपे नाही. भारत सरकार वर्षअखेरीस देशातील सर्वांचे लशीकरण पूर्ण होणार असल्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा प्रकारच्या थापा मारणे बंद करावे, अशी जोरदार टीका सीरम समूहाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी केंद्र सरकारवर केली. तसेच, कोरोना प्रतिबंधक लशींचे एकत्रीकरण करून, त्याचे प्रयोग करणे हे अव्यवहार्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार‘ देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक उपस्थित होते.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन डॉ. पूनावाला यांना गौरविण्यात आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. पूनावाला म्हणाले, मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केली आहे. माझा मुलगा आदर यांनी निर्यातबंदीवर बोलण्यास मला मनाई केली आहे. पण, मी बोलणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट बरीच वर्षे जगातील १७० देशांना लस पुरवते. मात्र, त्यांना आता गरज असताना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिले आहेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत. असेही ते म्हणाले.

दोन लशींचे एकत्रीकरण करून त्याचे प्रयोग करण्यास माझा विरोध आहे. प्रयोगा दरम्यान, कोणाचे बरे वाईट झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार? दुसरीकडे लशींचे दोन डोस घेतलेल्या नागरीकांना सहा महिन्यांनंंतर बुस्टर डोसची गरज पडेल. त्यासाठी मी आणि सीरम इन्स्टिट्यूटमधील सर्व कर्मचार्‍यांनी तिसरा डोस घेतला आहे. कोव्हीशिल्डच्या दोन डोसमध्ये दोन महिन्यांचे अंतर असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हा प्रभावी उपाय असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. तसे निर्णयही घेतले जात आहेत. मात्र, लॉकडाउन करणे योग्य नाही. सरकारने लॉकडाउन करूच नये,’ असे पूनावाला यांनी म्हटले. ’कोरोना मृत्युदर खूपच कमी आहे. मृत्यू वाढत असतील, तरच लॉकडाउनचा पर्याय स्वीकारावा,’ असा सल्ला त्यांनी दिला.

पुण्याबाबत सरकार बोलण्यास तयार नाही

पुण्यात लस तयार होत आहे. तसेच, पुण्यात रूग्णसंख्यादेखील जास्त आहे. त्यामुळे सरकारने पुण्याला जास्त प्रमाणात लस पुरवली पाहिजे, असे मी सरकारला वारंवार सांगितले. पण ते माझे एकत नाहीत. पुण्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या जास्त असल्यामुळे इथे जास्त लस देण्यात याव्यात, असा आमचा विचार होता. मात्र, मोदी सरकारने याबाबत अद्याप उत्तर दिले नसल्याचे यावेळी डॉ. सायरस पूनावाला यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *