Pimpri Crime News : औंधमधील उद्योजक बाप-लेकासह पाच जणांवर मोक्का

Pimpri Crime News : औंधमधील उद्योजक बाप-लेकासह पाच जणांवर मोक्का

फसवणूक, अपहरण, खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल
Pckhabar- कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंधमधील उद्योजक बाप-लेकासह पाच जणांवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई केली.

टोळीप्रमुख गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय 36), नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध) या बाप-लेकासह गणेश ज्ञानेश्वर साठे (वय 35, रा. पिंपळे-निलख), राजू दादा अंकुश (रा. पिंपळे – गुरव), दीपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीप्रमुख गणेश आणि नानासाहेब यांच्यासह इतर आरोपींवर दंगा करून खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न करणे असे एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सांगवी, हिंजवडी, चतुःशृंगी, चंदननगर, पौड पोलिस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसर, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी  आज (मंगळवार) कारवाईचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *