Talegaon Dabhade News :
मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन केले अदा
Pckhabar-तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विद्युत विभाग, अग्निशमन विभाग, आस्थापना विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना मासिक वेतन वेळेवर मिळत नाही, मिळणारे वेतनही नियमानुसार मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जनसेवा विकास समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. मात्र,
आंदोलनकर्त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्याचे
लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
जनसेवा विकास समिती गेल्या तीन महिन्यापासून कंत्राटी कामगारांच्या विविध न्याय मागण्यांसाठी लढा देत आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांना कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याबाबत साकडे घातले होते.
जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटी कामगारांना घेऊन नगरपरिषद प्रशासनास मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद ठेवण्याबाबत लेखी निवेदन दिले. सोमवारी सायंकाळी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बैठक आयोजित करून त्वरित एक महिन्याचा पगार अदा केला. पगारातील फरकाबाबत समिती नेमून चौकशी करण्यात येईल व समितीच्या आदेशानुसार कंत्राटदार पगार देण्यास बांधील राहील असे लेखी हमी पत्र कंत्राटदारांकडून घेण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी यांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक समीर खांडगे, संतोष शिंदे, बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, रोहित लांघे, कल्पेश भगत व सर्व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Reply