Pimpri News: रावेतच्या उदंचनगृहात झाडे, कचरा अडकला, एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

Pimpri News: रावेतच्या उदंचनगृहात झाडे, कचरा अडकला, एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pckhabar- पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रावेत येथील उदंचनगृहात झाडे, कचरा अडकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

एमआयडीसीकडून पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात पाणीपुरवठा केला जातो.

राज्यासह पुणे जिह्यात जोरदार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह मावळमधील पाणी पुरवठा होणार्‍या पवना धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू असून धरण 70 टक्के भरले आहे. त्यामुळे पवना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

रावेत येथील उदंचनगृहाजवळ वाहून आलेली  झाडे, कचरा अडकला आहे. महामंडळाचे अशुध्द जलकेंद्र 50 टक्के क्षमतेने कार्यन्वित आहे. त्याचा परिणाम महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रास तसेच महामंडळाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेस, संरक्षण खात्यास, होणा-या पाणी पुरवठ्यावर झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काळजीपूर्वक वापर करावा, असे आवाहन उपअभियंता कल्पेश लहिवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *