Article By Dr. Amit Nemane : माझ्या जीवनाचा शिल्पकार !!

Article By Dr. Amit Nemane : माझ्या जीवनाचा शिल्पकार !!

डाॅ. अमित नेमाणे
Pckhabar-अगदी काल-परवा ची गोष्ट आहे, नेहमीप्रमाणे दवाखान्यात बसलो होतो, माझ्या डेंटल क्लिनिक ला पेशंटची बरीच वर्दळ असते, अगदी पेशंटशी संवाद साधताना सतत चालणारा माझा तोंडाचा दांडपट्टा एक दहा मिनिटांसाठी थांबला आणि समोरच्या वर्तमानपत्रावर नि नजर टाकली तितक्यात कोणी एक इसम साधारणतः 60 वर्षाची असावेत क्लिनिकचा दरवाजा ठोठावून आत आले ते ,”नमस्कार डॉक्टरसाहेब ! ” आवाजामध्ये कमालीचा आदर पूर्वक भावना , पांढर्‍या रंगाचा शर्ट , करड्या रंगाची जरीची कळकट वाटणारी पॅन्ट, उजव्या हातात निळसर छटा असलेला रूमाल , बहुदा सतत घडी मोडल्यामुळे तो रुमाल बराचसा अस्ताव्यस्त झाला होता. गोरा वर्ण , डोक्यावर तुरळक केस आणि रुबाबदार मिशी , जेणेकरून संपूर्ण त्यांच्या पेहराव यात केवळ मीशीच त्यांच्या रुबाबदार पणाची साक्ष देत होती.माझ्या मनात मी त्याक्षणी पुटपुटलो , ” कुलकर्णी सर !! ” मी विषय पुढे नेत म्हणालो , “बसा ना सर ! ” सरांनी मला ओळखले होते. परंतु ते माझी तोच त्यांचा ‘अमित ‘असल्याची खात्री करून घेत होते. पुढे ओळखी अधोरेखित झाल्या. गप्पा झाल्या. माझ्या विद्यार्थी जीवनाला तात्काळ उजाळा मिळाला.नंतर अर्ध्या तासाने सर दवाखान्यातून माझा निरोप घेऊन गेले, त्यांना जाताना पाठमोरे पाहून एक विलक्षण अभिमान वाटला ,माझ्यासारखे अनेक उच्चशिक्षित विद्यार्थी त्यांनी घडविले होते.

गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो .अनेक वर्षांची गुरू-शिष्याची परंपरा ही आपल्या भारत देशाला आहे अगदी शिशु वर्गापासून ती माझी वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत, अनेक शिक्षक माझ्या दृष्टिपटलावरती रेंगाळू लागले त्यातील काही शिक्षक खरच अगदी ठळकरित्या दिसू लागले. काही त्यांची वाक्य पुन्हा कानांमध्ये घुमू लागली त्यापैकीच एक प्रोफेसर महाजन सर. सत्याची आणि यशाची गोडी लागली की पुन्हा पुन्हा यश ,मग ते कुठल्याही क्षेत्रात असो आपलंसं करण्यात रस वाटतो . अभ्यासाची कला , अभ्यास हा कसा एक कंटाळवाणा कार्यक्रम नसून मनोरंजक गोष्ट आहे हे मला समजले महाजन सरांमुळेच. आपापल्या विद्यार्थ्यांची प्रगतीच्या आलेखावरती चर्चा करायला येणाऱ्या इतर पालकांसमोर महाजन सर नेहमीच आदर्श विद्यार्थी म्हणून मला उभे करायचे, अगदी तराजूत बसण्या इतपत आदर्श विद्यार्थी मी कधीही नव्हतो. परंतु सर्वांचा मान राखण्यासाठी मी सतत या आदर्श विद्यार्थी संकल्पनेला शोभेल असे आचरण व अभ्यास करायचो आणि नेमक्या ह्याच आमच्या कृती दर्शक वागणुकीमुळे माझा हा प्रवास आज अमितपासून डॉक्टर अमितपर्यंत पोहोचला. त्यामुळे महाजन सर माझ्या जीवनाचे एक शिल्पकारच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

त्याबरोबरीने माध्यमिक शाळेतल्या गंभीर बाई , प्राथमिक शाळेतल्या झोपे बाई , महाविद्यालयीन जीवनातले बर्वे सर आणि अगदीच अलीकडच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर अभिजीत जाधव सर हे सर्व आज माझ्या डॉक्टरकीच्या पदवीचे शिल्पकार आहेत .

हे तर सर्व प्रत्यक्ष गुरु परंतु अप्रत्यक्ष गुरुजन ही माणसाच्या जीवनावरती प्रचंड प्रभाव टाकतात. आई-वडील हे कुठल्याही व्यक्तीचे प्रथम गुरु असतात. अगदी जन्मापासून ते मुलगा-मुलगी करिती होईपर्यंत त्यांचे संस्कार हे व्यक्तीला घडवित असतात ,अगदी शास्त्रीय दृष्ट्या सांगावयाचे झाले तर ” सायकोसोशल थेअरी ” असं सांगते की मुलांचे संपुर्ण आयुष्य व त्याची वैचारिक जडणघडण ही त्याच्या बालपणातच होते आणि त्या बालपणात त्याच्यावर सर्वाधिक प्रभाव हा अर्थातच आई-वडिलांचा असतो. म्हणून प्रत्येकाच्या जीवनाच्या प्रवासातील ते सर्वात मोठे मार्गदर्शक असतात. ” सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ” हे सुभाषित ही आपल्या परिचयाचे आहे , याचा अर्थ आपणास असा सांगतो की व्यक्तीच्या आयुष्यात त्त्याचे सवंगडी हे सर्वाधिक प्रभावी असू शकतात. माझे वैयक्तिक सांगायचे झाले तर डॉक्टर हितेश बुरडे हा माझा मित्र सखा अगदी माणूस म्हणून कशी रुग्णसेवा करावी , कसे जगावे याचे बाळकडू पाजणारा माझा व माझ्या जीवनातल्या यशाचा भागीदार आहे . इतिहासातील अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या आपणास सर्वश्रुत आहेतच. खरंच माणूस समाजशील प्राणी आहे. त्याचे आयुष्य हे इतरांच्या प्रभावाने बदलत असते आणि होकारार्थी लोकांप्रमाणे नकारार्थी लोकांचा प्रभावही समाजकंटक तयार करतो . साधारणपणे समाजातील 70 टक्के लोक हे इतरांना पासुन प्रभावित असतात आणि राहिलेल्या 30% लोकांत अर्धे सुसंस्कारी तर बाकीचे कुविचार असतात. त्यामुळे सदर विचारांचा प्रभाव वाढवायचा असल्यास त्या मूलभूत 15% संस्कारी लोकांचे आचरण करणार्या लोकांना त्यांचा प्रभाव इतरांवर पाडणे गरजेचे आहे. असे स्वाध्याय चळवळीतले पांडुरंग शास्त्री आठवले म्हंजे आमचे दादा सांगतात. यामध्ये नेमकेपणा वाटतो .
” डॉक्टर साहेब आहात का ? ” असा आवाज रिसेप्शन मधून आला , अचानक विचारांची लागलेली तार तुटली आणि वैचारिक महासागरातून ओला चिंब होऊन बाहेर पडलो. आयुष्यात भेटलेल्या ह्या काही मूठभर लोकांचा ज्यांचा माझ्या आयुष्यावर प्रभाव आहे, त्यांना भेटायचे आणि अशा अनेक मुलांना, समाजातील लोकांना वैचारिक भांडवल देऊन आपण इतरांच्या ” माझ्या जीवनाचा शिल्पकार ” या लेखात नाव कमवायचे या दृढनिश्चयाने पुढील पेशंट तपासण्यास चालू केले आणि तात्काळ वरील लेख लिहायला घेतला .

वरील लेखाचे लेखक डॉ अमित नेमाणे हे पेशाने दंतवैद्यकीय व्यवसायिक असून वरील विचार हे त्यांचे वैयक्तिक आहेत. कुठल्याही समाज भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही तशी माझी प्राज्ञा ही नाही.

डॉ.अमित नेमाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *