Editorial : महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी!

Editorial : महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांची जोरदार मोर्चेबांधणी!
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सात महिन्यावर सार्वत्रिक निवडणूक येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  शिवसेनेचा नुकताच कार्यकर्ता मेळावा पार पडला. भारतीय जनता पक्षाने महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार फलकबाजी करून वातावरण निर्मिती केली आहे. तर शहर काँग्रेसने वाढत्या महागाई विरोधात सायकल रॅली, निषेध आंदोलन करून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ‘जाण’ आणली आहे.  महापालिका निवडणूकीवर कोरोनाचे सावट असतानाही सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छूक कार्यकर्ते तयारीला लागल्याने शहरात निवडणूकीचा ‘फील’ येऊ लागला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली असून फेब्रुवारी 2022 पर्यंत विद्यमान सभागृहाचा कार्यकाळ आहे. तत्पूर्वी महापालिका निवडणुकीची घोषणा होणे गरजेचे आहे. गेल्या दीड वर्षांपासून देशावर कोरोना महामारीचे संकट आहे. कोरोनाच्या दोन तीव्र लाटा येऊन गेल्या आहेत. देशभर लसीकरणाची मोहीम सुरू असली तरी लसीच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहीमेला म्हणावा तसा वेग आला नाही. अशा परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अद्यापही अनेक निर्बंध सुरुच आहेत.

कोरोनाच्या या संकटातच  पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, मिरा भाईंदर, नागपूर, नाशिक, अहमदनगर या राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक सात महिन्यावर आली आहे. तर कोरोना संकटामुळे औरंगाबाद, नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक न झाल्याने याठिकाणी प्रशासक नेमण्यात आला आहे. कोरोनाचे संकट असले तरी पिंपरी-चिंचवड शहरात सर्वच राजकीय पक्षांनी आगामी निवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

भाजपाचा  ‘शंभर प्लसचा नारा’

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचे 2017 मध्ये  77 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, आगामी निवडणुकीत शहर भाजपने 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा ’शड्डू ठोकला’ आहे. भाजपातर्फे  पक्षाच्या ’बुथ सक्षमीकरण’ अभियानाला सुरवात करण्यात आली आहे. आमदार लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकार्‍यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या ’डोअर टू डोअर’ भेटीगाठी घेऊन चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. शहर भाजपाचा हा ’बूथ सक्षमीकरण’ पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. तसेच बुधवारीच भाजपचे माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांनी शहर भाजपचा आढावा बैठक घेऊन पक्ष संघटनेच्या कामाची माहिती घेतली.

भाजपचा गैरकारभार चव्हाट्यावर आणण्यास राष्ट्रवादीला अपयश

पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्तेला 2017 मध्ये भाजपने
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सुरूंग लावला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 36 नगरसेवक निवडून आले. भारतीय जनता पक्षाच्या साडेचार वर्षांच्या कारभारात गैरकारभाराची, वाढीव बिलांची विविध प्रकरणे समोर आली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर आणण्याची मोठ्या प्रमाणात संधी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे, नगरसेवकांचे भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर लागेबांधे आहेत. त्यामुळे भाजपच्या चुकीच्या कारभाराला राष्ट्रवादी काँग्रेसची एकप्रकारे साथच राहिली आहे. अपवाद फक्त  कै. विरोधी पक्षनेते दताकाका साने यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कालावधी आहे. साने यांनी भाजपच्या गैरकारभाराची चांगलीच पोलखोल करून भाजपला सळो की पळो सोडले होते. आतापर्यंत सोईस्कर भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक जवळ येत असल्याने भाजपचा कारभाराला नावाला विरोध करणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी जन हिता पेक्षा स्व: हिताला प्राधान्य दिल्याने राष्ट्रवादीने विरोधी पक्ष म्हणून प्रभावी कामगिरी करता आली नाही.  तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र मोठ-मोठे जाहिरात फलक लावून शहराच्या विकासाचे शिल्पकार अजितदादाच आहेत, अशी वातावरण निर्मिती केली आहे.

50 नगरसेवक निवडून आणण्याची
शिवसेनेची गर्जना

शिवसेनेचा 9 जुलै रोजी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, खासदार संजय राऊत यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन पिंपरी महापालिकेवर भगवा फडकविणार असल्याची गर्जना केली. राऊत यांनी फक्त 50 नगरसेवक निवडून आणून शिवसेनेचा महापौर करणारच, असेही छातीठोकपणे सांगून शिवसैनिकांचा उत्साह वाढविला आहे. तसेच शिवसेनेच्या वतीने राज्यभरात शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. हे अभियान पिंपरी-चिंचवड शहरातही जोरदार सुरू असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.

काँग्रेसचा ‘एकला चलो’ चा नारा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे शहर काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, वाढती महागाई या विरोधात सायकल रॅली, निषेध आंदोलन करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, 2017 च्या पिंपरी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भोपळा मिळाला असल्यामुळे  शहरात काँग्रेसचे स्वबळावर किती नगरसेवक निवडून येतील याबाबत शंकाच आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच नगरसेवक आहे. मनसेच्या वतीनेही निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठका, आढावा घेणे सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्वच आलबेल सुरू आहे. वंचितची ना चर्चा आहे ना शहरात अस्तित्व! तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष वाढती महागाई, कामगार विरोधी कायदे या विरोधात आवाज उठवत आहे.

एकंदरीत कोरोनाचे सावट असले तरी प्रमुख राजकीय पक्षांनी फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होणार हे गृहीत धरून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीपर्यंत काय होईल, हे सांगता येत नाही. तर काँग्रेसने ‘एकला चलो’ची भुमिका घेतली आहे.

महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप-77 –
(भाजपच्या दोन नगरसेवकांचे निधन)
एनसीपी-36
(राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन)
शिवसेना-9
अपक्ष-5
मनसे-1
एकूण- 128

संपादक
Pckhabar. Com

———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *