
Article By Dipjyoti Yadav- Pawar वारी… एक अविस्मरणीय सोहळा!
Pckhabar- वारी… महाराष्ट्राच्या संस्कृतीमधील एक अविभाज्य घटक आहे. साधारणः तेराव्या शतकापासून वारीची परंपरा सुरू झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडिल वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी वडिलांची ही प्रथा पुढे सुरूच ठेवली. वारीच्या निमित्ताने ज्ञानदेवांनी सर्व जाती-पातीच्या लोकांना एकत्रित आणले. वारीचे व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर या सारख्या संतांनी वारीची परंपरा पुढे सुरू ठेवली. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्याही घरामध्ये वारीची परंपरा होती. या संतांच्या पश्चात हैबतबाबा यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून दिंडीसह पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यामध्ये केले.
आपण 21 व्या शतकात वावरत असताना देखील वारीची ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. आज देखील आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या कानाकोपर्यातून लाखो वारकरी या सोहळ्यासाठी आळंदी आणि देहू येथे दाखल होत असतात. वारी म्हटलं की वारकरी असो सामान्य माणूस सर्वांच्याच मनामध्ये एक चैतन्य संचारते. हा वारीचा सोहळा साधारण 19- ते 20 दिवसांचा असतो. या दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण भक्तीमय झालेले असते. वारीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक माणूस हा तेवढ्या दिवसांपुरता का होईना वारकरी झालेला असतो. अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये पालख्यांचे प्रस्थान पंढरपूच्या दिशेने होत असते. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या वारी सोहळा अक्षरक्षाः भक्तीमध्ये तल्लीन होऊन अनुभवत असतो. वारीमध्ये सहभागी न होताही न्यूज चॅनेलच्या माध्यमातून दाखवल्या जाणार्या थेट प्रक्षेपणाद्वारे घरात बसून देखील वारीचा तेवढाच आऩंद मिळतो, जेवढा वारीमध्ये सहभागी होऊन मिळतो.
या पालखी सोहळ्याच्या कालावधीमध्ये अनेक जाती-पातीचे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आलेले असतात. तरीही कोणाच्याही मनामध्ये यत्किंचितही जाती भेद निर्माण होत नाही. कोणाच्या मनामध्ये जातीचा विचार शिवत नाही. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन देखील अतिशय शांततेने हा सोहळा पार पडतो. सगळ्यांच्या ओढावर फक्त ’ज्ञानबा तुकाराम’चा जयघोष असतो. प्रत्येकाच्या मनामध्ये फक्त पांडुरंगाला भेटण्याची आस असते. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने प्रत्येक वारकरी आपली पाऊले टाकीत असतो. देहूपासून पंढरपूरचे अंतर हे 235 कि. मी. आहे. तर आळंदीपासून हे अंतर 225 कि. मी. आहे. हे अंतर वारकरी 17 ते 18 दिवसांमध्ये विठूरायाच्या गजरामध्ये अतिशय सहजपणे आणि आनंदाने पार करत असतो. हा सोहळा पंढरपूरला जात असताना वाटेवर ठिक-ठिकाणी वारकर्यांचे मनोभावे स्वागत होत असते. वारकर्यांचे प्रत्येक गावामध्ये घरच्या माणसांसारखे आदरतिथ्य केले जाते. अतिशय भारावलेल्या वातावरणामध्ये पालखी सोहळा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतो. त्यातूनच पडणारा पाऊस हा जणू संतांच्या दर्शनासाठी आसुलेला असतो.
परंतू, 2020 मध्ये आलेल्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे महाराष्ट्राची वर्षांनुवर्षांची परंपरा खंडीत होतेय की काय अशी भिती निर्माण झाली होती. या महामारीमुळे पायी वारी सोहळा गेल्या दोन वर्षांपासून रद्द झाला आहे. इतिहासामध्ये प्रथम 2020 आणि 2021 मध्ये या दोन वर्षांमध्ये पालखी सोहळा बसने पंढरपूरला नेला आहे. हा क्षण समस्त महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय वेदनादायी आहे. अनेक वर्ष वारी करत असताना संत तुकाराम महाराज एका वर्षी आजारी असल्यामुळे वारी करू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी 24 अभंग रचना करून पांडुरंगला आर्त हाक दिली होती.
का माझे पंढरी न देखती डोळे!
काय हे न कळे पाप त्यांचे!!
पाय पंथ का हे न चळती वाट!
कोण हे अदृष्ट कर्म बळी!!
आज हीच अवस्था लाखो वारकर्यांची झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ शकला नाही. आज प्रत्येक वारकर्यांच्या मनामध्ये पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होण्याची आस निर्माण झाली आहे. कधी एकदा कोरोना नावाचा आजार संपूर्णपणे नष्ट होऊन सगळे जग सुरळीत होऊन पायी वारीची परंपरा पुन्हा नव्याने चालू होणार आहे, असे मनोमन झाले आहे. गेल्या वर्षांपासून पालखी सोहळा, वारकर्यांचे स्वागत, रिंगण सोहळा, किर्तन-भजन यासारख्या गोष्टी करू न शकल्यामुळे समस्त महाराष्ट्राला एक सनुेपण आले आहे. या सगळ्या गोष्टी साजर्या करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आसुसलेला आहे. शेवटी जाता-जाता एक भावना मनामध्ये येते ती म्हणजे
दर्शन दे रे!
देरे भगवंता!!
किती अंत आता!
पाहसी अनंता!!
दिपज्योती यादव-पवार










Leave a Reply