Article By Dr. Ankush Jadhav: स्वस्त, मस्त व आरोग्यदायी – केळे

Article By Dr. Ankush Jadhav: स्वस्त, मस्त व आरोग्यदायी – केळे

Pckhabar-  केळे हे सर्वपरिचित, सर्वांना परवडणारे व वर्षभर उपलब्ध होणारे  फळ असून  हे मूळचे भारत व मलाया येथील  आहे. युरोपात याला पौराणिक काळात “स्वर्गातील सफरचंद”म्हणत. केळ्याच्या जवळजवळ ३० ते ४० जाती वा प्रकार आहेत. ती विविध नावांनी ओळखली जातात. त्यात ही वेलची केळी चांगली मानली जातात. भारतातून त्यातही महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात होतात. गेल्या वर्षी भारतातून ६०० टन केळी निर्यात झाली. त्यात जळगांव मधील २२ मेट्रिक टन केळीचा समावेश आहे.

गेल्या तीन वर्षात भारतातून झालेली केळीची निर्यात—
२०१८-१९-३४००० टन,४३३ कोटी रुपये किंमत.
२०१९-२०–१, ९५,००० टन, ६६० कोटी रुपये किंमत.

  २०२०-२१–१, ९१,०००टन, ६१९ कोटी रुपये किंमत.
जळगांवची केळी देशातील अन्य भागापेक्षा तेथील भौगोलिक वातावरणामुळे अधिक तंतुमय व खनिज पदार्थांनी समृद्ध आहेत. जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन हे भारतात होते.

केळी मध्ये पुढीलप्रमाणे अन्नमूल्य असते.

आर्द्रता-७०.१%, प्रथिने-१.२%,
खनिजे-०.८%, तंतुमय पदार्थ-०.४%, मेद-०.३%, पिष्टमय पदार्थ-२७.२%, कॅल्शियम-१०मि.ग्रॅ. फॉस्फोरस-३६मि. ग्रॅ.,लोह-०.९ मि. ग्रॅ., जीवनसत्त्व क-७मि. ग्रॅ.,काही प्रमाणात बी कॉम्लेक्स. कॅलोरी-११६. (हे सर्व१००ग्रॅम मधील मूल्ये)

भारतातील पारंपरिक औषधांत हे फळ तारुण्य टिकविणारे, आरोग्यवर्धक, तारुण्य व जोम देणारे मानले जाते.
केळे हे बद्धकोष्ठता, पोटातील व्रण, अतिसार, आव पडणे, संधिवात, वातरक्त, अलर्जी, मूत्रविकार, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, भाजणे, जखमा होणे, क्षय इ.अनेक रोगांवर उपयोगी आहे.

पोटात काही बिघाड झाला असेल तर पिकलेले केळ खावे. त्याने पोटाचे अनेक आजार बरे होण्यास मदत होते. अतिसार वा आव पडत असेल तर जास्त पिकलेले केळ खावे. यात असणाऱ्या पेक्टीन मुळे  पाणी शोषले जाते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल तर केळी खावीत. यात असणाऱ्या लोहामुळे हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढण्यास मदत होते. यात असणाऱ्या  अमिनो ऍसिड मुळे अलर्जी होत नाही. क्षयावर केळीच्या झाडाचा रस वा केळी उकडून त्याचा लगदा दिल्यास चांगला उपयोग होतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारीवर उकडलेले केळफल व दही द्यावे. केळफूलामुळे “प्रोजेस्ट्रॉन हार्मोन” वाढतात व रक्तस्राव कमी होतो. भाजलेल्या जागेवर पिकलेल्या केळचा लगदा लावावा. ज्यांची प्रकृती कृश वा बारीक आहे त्यांनी दररोज १-२ केळी खावीत.

वजन वाढविण्यासाठी केळी उपयोगी असून केळ्यामुळे भूक शमते. यातील फायबर्स व अन्य पोषक तत्वांमुळे भूक नियंत्रित होते. केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबोयोटीक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेतात. याच्या नियमित सेवनाने चयापचनाची क्रिया चांगली होते.
शरीरात मांस वाढते. मानसिक ताण तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. सामान्यतः दोन केळी खाल्यानंतर शरीराला पुढील दीड तासासाठी ऊर्जा, शक्ती मिळते. मूत्रपिंडाच्या अनेक आजारांवर केळी उपयोगी आहेत.

कच्च्या केळाची भाजी करून खावी. वेफर्स बनवून खावेत. कच्च्या केळाचे वाळवून केलेले पीठ गव्हाच्या कणकेपेक्षा तिप्पट पौष्टीक असते. केळ्याचे अनेक पदार्थ बनविले जातात. कच्चे केळ तुरट रसाचे तर पिकलेले केळ मधुर(गोड)रसाचे असते. पिकलेले केळ पित्तशामक आहे.

काही नियम-
कच्चे केळ खाऊ नये. अपचन होण्याची शक्यता असते.
कच्या केळी मध्ये २०ते २५ टक्के ठिसूळ पदार्थ अर्थात स्टार्च  असतात. पिकताना या स्टार्च चे रूपांतर साखरेत होते.

केळे जेवणानंतर ताबडतोब न खाता थोड्या वेळाने खावे.

रात्री जेवणानंतर केळ खाऊ नये. सर्दी होण्याची शक्यता असते.

केळी कधीही फ्रीज मध्ये ठेऊ नयेत. कारण ती पिकण्याची प्रक्रिया थांबते.

जास्त पिकलेले केळ खावे.

मधुमेही नी जास्त पिकलेले केळ न खाता अर्ध पक्व खावे. केळी शक्यतो नैसर्गिक रित्या पिकलेली खावीत. कार्बाईड मुळे पिकवलेली केळी खाणे टाळावे. योग्य प्रकारे केळी खाऊन आपले आरोग्य व रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *