Lonavala News : पर्यटननगरी लोणावळा शहरात जमावबंदी लागू

Lonavala News : पर्यटननगरी लोणावळा शहरात जमावबंदी लागू
Pckhabar-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पर्यटनस्थळी जमावबंदीचे कलम 144 ( 1 ) ( 3 ) लागू करण्यात आले असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे . पुणे जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख यांनी आज (शुक्रवार ) हा आदेश पारित केला आहे. यामध्ये धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत . लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी वाहू लागले आहे असे समजताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात . यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास बंदी असताना देखील हे आदेश व नियमांची पायमल्ली करत नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचत होते . करोनाची दुसरी लाट ओसरली , परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये , नियमांचे पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते , परंतु , त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करत पर्यटकांनी मागील काही विकेंडला मावळातील विविध पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी केली होती .

याच पार्श्वभूमीवर लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले असून यापार्श्वभूमीवर लोणावळ्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी शहरातील व्यापारी संघटना, भाजी विक्रेते संघटना, चिक्की व्यावसायिक प्रतिनिधी यांची नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती. यावेळी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक श्रीधर पुजारी, भरत हरपुडे, विशाल पाडाळे, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही . त्याच बरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे . प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये असे आवाहन मुख्याधिकारी सोमनाथ जाधव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी यावेळी केले .

हे नियम कोठे लागू आहेत !

भुशी डॅम , घुबड तलाव , लोणावळा डॅम , तुंगाली डॅम , राजमाची पॉइंट , मंकी पॉइंट , अमृतांजन ब्रिज , वलवण डॅम , एकविरा मंदीर परिसर , वेहेरगाव , टायगर पॉइंट , लायन पॉइंट , शिवलिंग पॉइंट , कार्ला लेणी , भाजे लेणी , लोहगड किल्ला , तुंग किल्ला , विसापुर किल्ला , तिकोणा किल्ला , पवना धरण परिसर , भाजे धबधबा धबधबे , धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील व खालील बाबींना प्रतिबंध असेल .

1 ) पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील .

2 ) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे , खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे ,

3 ) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे ,

4 ) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे , धबधबे , दांचे कठडे , धोकादायक वळणे इ . ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे ,

5 ) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे , मद्य बाळगणे , मद्यवाहतुक करणे , अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे .

6 ) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे ,

7 ) वाहनांची ने – आण करताना बेदरकारपणे वाहन चालवणे , धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणे ,

8 ) सार्वजनिक ठिकाणी खादयपदार्थ , कचरा , काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघडयावर व इतरत्र फेकणे .

9 ) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे , टिंगल टवाळी करणे , महिलांशी असभ्य वर्तन करणे , असभ्य हावभाव करणे , शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे .

10 ) धबधब्याच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *