Pimpri News : सहा महिन्यापासून गटनेता निवडता येत नाही, अन् म्हणे 50 नगरसेवक निवडून आणू

Pimpri News : सहा महिन्यापासून गटनेता निवडता येत नाही, अन् म्हणे 50 नगरसेवक निवडून आणू

सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांचा खासदार संजय राऊत यांना टोला

Pckhabar- महापालिकेतील गेल्या सहा महिन्यापासून साधा गटनेता निवडता आला नाही, ते 50 नगरसेवक निवडून आणून महापालिकेची सत्ता काबीज करण्याच्या गप्पा करत आहेत, असा सणसणीत टोला पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.

ते  आज (बुधवार)प्रसार माध्यमांशी बोलत होते.
शुक्रवारी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार राऊत उपस्थित होते.

त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ’पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत यावेळी शिवसेनेचा महापौर बसवायचाच हे ध्येय ठेवून शिवसेना कामाला लागली आहे. आगामी मनपा निवडणूकीत शिवसेनेचे पन्नास नगरसेवक निवडून आणण्यासाठी वातावरण चांगले आहे. 55 आमदारांवर सेनेचे मुख्यमंत्री झाले त्याप्रमाणे पन्नास नगरसेवकांवर पिंपरी चिंचवडचा महापौर करुन दाखवू. मागील पाच वर्षापुर्वी भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी चिंचवड अशा घोषणा दिल्या होत्या. पण या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा अंत झाला नाही, तर हा राक्षस जास्त वाढताना दिसत आहे. हाच मुद्दा घेऊन मनपाची निवडणूक शिवसेना लढेल असे ’ असे वक्तव्य केले होते. त्याला ढाके यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले.

सहा महिन्यापुर्वी शिवसेनेचे राहूल कलाटे यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर अद्याप दुसऱ्या नगरसेवकाची नियुक्ती करण्यात आली नाही.

ढाके यांच्या टीकेमुळे आता स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध ढाके असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर शहर शिवसेनेचे पदाधिकारी ढाके यांना काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *