Nigdi News : मानसिक ‘वारीला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

Nigdi News : मानसिक ‘वारीला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि संस्कृती संवर्धन व विकास महासंघ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने योगिनी एकादशी  ते आषाढी एकादशी या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये दररोज सायंकाळी ’वारी पंढरीची’ या ऑनलाईन उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षापासून पंढरीच्या वारीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे असंख्य निष्ठावान वारकर्‍यांच्या मनांत आनंदनिधान असलेल्या वारी सोहळ्याला मुकल्याची भावना आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही संस्थांनी मानसिक वारीची संकल्पना राबवून दररोज सायंकाळी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी एका संतचरित्राचे कथन केले जाते. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह.भ.प. किसनमहाराज चौधरी हे संत ज्ञानोबा ते तुकोबा आणि स्त्रीसंत मुक्ताई ते बहिणाई या संतांच्या जीवनचरित्रावर आपल्या रसाळ वाणीतून निरूपण करीत आहेत.

सध्याच्या भौतिकता, चंगळवादी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून संतांनी केलेले कष्ट, त्याग तसेच त्यांच्या ठिकाणी असलेली भूतदया, कारुण्य याची ओळख जनसामान्यांना व्हावी या उद्दिष्टांबरोबरच कोरोना महामारीच्या या काळात मानवी जीवनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना कमी होऊन सकारात्मक दृष्टिकोन तसेच मन:शांती लाभावी हा उपक्रमाचा हेतू आहे. या ऑनलाईन उपक्रमाचा दररोज किमान दीड ते दोन हजार भाविक लाभ घेत असून त्यामध्ये परदेशात वास्तव्यास असलेले भाविकदेखील समाविष्ट आहेत. गतवर्षी या उपक्रमांतर्गत ’हरिपाठ’ या विषयावरील बावीस प्रवचनांचा लाभ नागरिकांनी घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *