Dehu News : तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचविण्यासाठी ‘सप्तरंगी’ आहार द्या : वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव

Dehu News : तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचविण्यासाठी ‘सप्तरंगी’ आहार द्या : वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव

अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे आयोजित व्याख्यानात डॉ. यादव यांचे पालकांना बहुमुल्य मार्गदर्शन

Pckhabar- ”कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मुलांना परिपूर्ण आहार, फळे (सप्तरंगी) खायला द्यावा. तसेच न्युमोनिया होऊ नये, यासाठीची लहान मुलांना न्यूमोकोकल लस टोचून घ्यावी”, असे आवाहन देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी पालकांना केले.

सृजन फाऊंडेशन संचलित अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने कोरोनाच्या या संकटकाळात पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी ‘कोरोना : दंतकथा आणि वास्तव’ या विषयावर डॉ. किशोर यादव यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विठ्ठल रखुमाई ट्रस्ट पंढरपूरचे विश्वस्त व देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयाच्या फिजिक्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख डॉ. भरत कानगुडे, मिरा कानगुडे, सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य डॉ. कविता अय्यर, माजी उपसरपंच सचिन कुंभार, बिभीषण खोसे, तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाचे सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीत देहूगाव कोविड सेंटरच्या माध्यमातून अहोरात्र रुग्णांची सेवा केल्याबद्दल डॉ. यादव यांचा शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.पत्रकार राजेंद्र काळोखे, रामकुमार अगरवाल, मंगेश पांडे, संदीप भेगडे, प्रभाकर तुमकर, महादेव वाघमारे, प्रकाश यादव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

डॉ. यादव पुढे म्हणाले” कोरोना झाल्यानंतर न्युमोनियाही होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे रूग्ण गंभीर होतो. तथापि पालकांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना न्युमोनिया होऊ नये, यासाठीची मुलांना न्यूमोकोकल लस टोचून घ्यावी’. देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध होणार असून एक वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही लसीचे तीन डोस मोफत आहेत. यासाठी पालकांनी नावनोंदणी करावी. तसेच पुढील वयोगटातील मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन खासगीमध्ये ही लस देता येईल. एक डोसची किंमत 5 हजार रुपये असे 15 हजार रुपयांचे तीन डोस देणे आवश्यक आहे. मुलांना परिपूर्ण आहार, फळे (सप्तरंगी) खायला द्यावा. मुलांचे नियमित लसीकरण करावे, त्यांची शारीरिक हालचाल गरजेची आहे.

कोरोनाची लक्षणे जाणवल्या नंतर अनेक जण दुखणे अंगावर काढतात. लक्षणे जाणवताच घरगुती प्रयोग न करता फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा. कुटुंबातील एक सदस्य पाॅझिटीव्ह आल्यानंतर इतरांनी तत्काळ चाचणी करून घ्यावी, असे सांगून डॉ. यादव म्हणाले योग्य वेळी उपचार करून रूग्ण बरा होता. मात्र, अती आत्मविश्वासामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावले आहे. त्यामुळे कोरोनाच होऊ नये म्हणून प्रत्येकाने एसएमएस म्हणजे सोशल डिस्टेंसिंग, मास्क आणि सॅनिटाइजर या तीन गोष्टींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

देहूगाव परिसरात 2 बालरोगतज्ज्ञ असून त्यांच्याकडे फक्त 4 बेड उपलब्ध आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लहान मुलांसाठी 20 बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. मात्र, पालकांनी गाफील न राहता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांची काळजी घ्यावी, असेही डॉ. यादव यांनी आवाहन केले. त्यांनी पालकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

प्रास्ताविक करताना प्राचार्या कविता अय्यर म्हणाल्या” आयुष्यात बदल हा करावा लागतो. कोरोनामुळे कार्यालय, शाळा घरी आली आहे. मात्र, या कोरोना कालावधीमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. आपल्याकडे आलेली माहिती किती खरी आहे, किती खोटी आहे, याची माहिती होणे गरजेचे आहे. याच हेतूने आणि तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर यादव यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. त्यांनी कोरोना कालावधीमध्ये दिड हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. याबद्दल त्यांचे विशेष आभार.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी तर आभार सहशिक्षिका प्रियंका नागरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *